निष्क्रिय व चुकीचा कारभार खपवून घेणार नाही!
आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
मालवण तालुक्याचा सुमारे साडेसात कोटींचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा
कृती आराखडा आढावा बैठक आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
अमित खोत | मालवण : शासन-प्रशासन हे जनतेचे सेवक आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकरी जनतेला अधिकाधिक मदत मिळण्याच्या दृष्टीने सरसकट पंचनामे करत असताना प्रशासन स्तरावर अधिकाऱ्यांनी गतिमान पद्धतीने काम केलेच पाहिजे, असे सांगत अपूर्ण कामांच्या विषयावरून आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. निष्क्रिय व चुकीचा कारभार खपवून घेणार नाही. तुमच्याशी वैयक्तिक वाद नाही. मात्र, माझ्या शेतकरी व जनतेसाठी तत्परतेने काम झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आमदार निलेश राणे यांनी मांडली.
दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थिती व संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या परिस्थितीवर मात करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे व आम्हा सर्वांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती व संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे. अर्धवट व अपूर्ण कामे खपवून घेतली जाणार नाहीत, अशा सक्त सूचनाही आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला दिल्या.
मालवण तालुक्याच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची आढावा बैठक आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी समर्थ मंगल सभागृह, कोळंब येथे संपन्न झाली. यावेळी सुमारे साडेसात कोटी रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा मांडण्यात आला. आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर अनेक गावांतील सरपंच व लोकप्रतिनिधींनी आणखी काही कामे या आराखड्यात सुचवली. त्यांचीही नोंद करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती शाम झाड, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिणी पाटील, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, जिल्हा परिषद सदस्या सोनाली घाडीगावकर, अक्षता गावडे, वर्षा सांबारी, राजा गावडे, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, योजना कांबळी, मानसी भोगावकर, दीपक चव्हाण, गणेश तोंडवळकर, माधुरी मसुरकर, संतोष गावडे, किसन मांजरेकर यांच्यासह सरपंच, अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या वर्षीच्या आराखड्यातील कामे अपूर्ण का?
यावेळी तहसीलदार गणेश लव्हे यांनी प्रास्ताविक केले. गेल्या वर्षीच्या आराखड्यातील काही कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ‘करतो, होणार’ यापेक्षा कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अभ्यासू कार्यशैलीतून घेतला सखोल आढावा
प्रत्येक विषयाची सखोल माहिती घेणे, हे आमदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. या बैठकीतही त्यांची अभ्यासू कार्यशैली पुन्हा एकदा दिसून आली. सर्व विभागांचा आढावा घेताना त्यांच्याकडे सखोल व परिपूर्ण माहिती होती.संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात नळपाणी योजना दुरुस्ती, तात्पुरती नळपाणी योजना, विंधन विहीर खोदणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे, विंधन विहीर दुरुस्ती तसेच टँकरने पाणीपुरवठा करणे, अशा विविध उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी गावांतील लोकप्रतिनिधींकडूनही कामे सुचवून घेण्यात आली. काही गावे व वाड्या आराखड्यात समाविष्ट करायच्या राहिल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांचीही नोंद घेण्यात आली.
अनेक कामे नव्याने सुचवली
काही ठिकाणी बंधाऱ्यांची उभारणी करणे गरजेचे असल्याचे सांगत दत्ता सामंत व उपस्थित लोकप्रतिनिधींनी यासंदर्भातील कामे सुचवली. दत्ता सामंत यांनीही अनेक विषय मांडले. उपस्थितांनी सुचवलेल्या सर्व कामांची नोंद घेऊन त्यांचा आराखड्यात समावेश करावा, असे निर्देश आमदार निलेश राणे यांनी दिले. तहसीलदारांनी आवश्यक त्या ठिकाणी आढावा बैठका घेऊन उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सूचित केले.
काही गावे तसेच वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी आराखड्यात काही गावे व वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. याव्यतिरिक्त आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार उपस्थित सरपंच व लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या अन्य गावांचा व वाड्यांचाही आराखड्यात समावेश करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी जिल्हा परिषद स्तरावरून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. पशुधनासाठी चारा व चारा बियाणे उपलब्धतेच्या दृष्टीनेही माहिती देण्यात आली.
निष्क्रिय कारभार खपवून घेणार नाही
दुष्काळ आणि पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा वेळेस सर्व अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या नात्यातून लोकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. अधिक कागदपत्रे मागून अडवणूक करू नका, सरसकट पंचनामे पुर्ण करा. अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा आणि चुकीचा कारभार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
आढावा बैठकीदरम्यान लघु पाटबंधारे विभागाच्या कामाकाजावर आमदार राणे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केला. दुरुस्तीची अंदाजपत्रके पूर्णपणे चुकीची आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागाने दाखवलेल्या १५४ बंधाऱ्यांपैकी प्रत्यक्षात केवळ ३६ बंधाऱ्यांमध्येच योग्य पद्धतीने पाणी अडवले गेले आहे. २ कोटी ६४ लाख रुपयांचा दाखवलेला खर्च योग्य नसून २५ टक्के बंधारे सोडल्यास तब्बल ७५ टक्के बंधारे निकामी किंवा अयोग्य स्थितीत आहेत. पुर्ण आराखडा तयार करून द्या. अश्या सूचना दिल्या.
अधिकारी बंधाऱ्यांची पाहणी केल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी २७ माणसेही उभी राहिली नाहीत. अधिकारी खोटी माहिती देत असून त्यांच्या कामावर माझा तीव्र आक्षेप आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
टँकरचे नियोजन
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आवश्यकता भासल्यास जानेवारी महिन्यापासून नागरिकांना टँकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी टँकरचे नियोजन आणि आराखडा आताच अंतिम करा. तालुक्यात वनराई बंधाऱ्यांची कामे झाली असली तरी जिथे अधिक गरज आहे, तिथे प्राधान्याने कामे पूर्ण करा. तहसीलदारांनी सर्व यंत्रणना कडक सूचना द्याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय कागदपत्रांच्या कचाट्यात अडकावे लागणार नाही.
मालवण तालुका कधीच कोणाकडे मागायला जात नाही
मालवण तालुका कधीच कोणाकडे मागायला जात नाही. येथील शेतकरी, मच्छीमार जनता स्वाभिमानी आहेत. त्यामुळे या संकटाच्या काळात मालवणला सरसकट मदत मिळालीच पाहिजे त्या दृष्टीने प्रशासन स्तरावर अधिक गतिमान काम झाले पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
सुमारे साडेसात कोटींचा आराखडा
बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना राणे म्हणाले, “तुमच्या गावात किंवा माहितीतील वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे प्रश्न राहून गेले असतील तर आत्ताच बोला. आज सर्व विभागांचे अधिकारी समोर आहेत. निधीची तरतूद आजच्या बैठकीच्या आधारावरच केली जाईल. नंतर नवीन प्रस्ताव दिले तर त्याला विलंब होतो किंवा वशिला लावूनही उपयोग होणार नाही. त्यामुळे ही संधी साधून आपापल्या भागातील विहिरी, नळ योजना आणि कृषी विभागाशी संबंधित अडचणी आताच नोंदवा असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत मालवण तालुक्यातील टंचाईच्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडण्यात आला. ८ गावे, ४३४ वाड्या असा मिळून सुमारे ७ कोटी 50 लाख रुपयांचा आराखडा मांडण्यात आला. यात काही नवीन कामेही सुचविण्यात आली. त्यामुळं आराखडा वाढणार आहे.
चिंदर तलाव पाण्याने भरला; आमदारांचे अभिनंदन
चिंदर तलावातील गाळ उपसा करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी केलेले विशेष प्रयत्न व निधीची उपलब्धता महत्त्वपूर्ण ठरली. सध्या चिंदर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. या तलावातून चिंदर, आचरा, त्रिंबक व पळसंब या चार गावांना पाणीपुरवठा होऊ शकतो, असे सांगत पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
शेतकरी जनतेप्रती आमदार निलेश राणे संवेदनशील!
संकटात असलेल्या शेतकरी जनतेला दिलासा व मदत मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. सातत्याने विधिमंडळात जनहिताची भूमिका मांडत असताना ततवर्षी नुकसान भरपाईचा निकष वाढवून घेण्यातही आमदार निलेश राणे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. आताही दुष्काळ स्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तसेच प्रशासन स्तरावर बैठका घेऊन ते सतत कार्यरत आहेत. आठ दिवसांपूर्वीच त्यांनी कुडाळ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची आढावा बैठक घेतली होती. त्यावेळीही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना तत्परतेने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्याच धर्तीवर मालवण तालुक्यातील बैठकीतही शेतकरी व जनतेप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता स्पष्ट झाली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यतत्परतेचे यावेळी विशेष कौतुक केले.













