रत्नागिरीत हायड्रोपोनिक गांजासह तिघे पोलिसांच्या जाळ्यात ३४.५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, दुचाकी, रिक्षा असा ४ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

​रत्नागिरी: प्रतिनिधी
शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत हायड्रोपोनिक गांजाची विक्री करणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३४.५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजासह दुचाकी, रिक्षा असा एकूण ४ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​१० ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहर परिसरात पोलीस गस्त घालत असताना, उद्यमनगर येथील लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय तथा लेप्रसी कॉलनीसमोर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. साहिल समीर सोलकर, सुफियान अनिस गुहागरकर आणि यशराज राजेश देसाई अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिन संशयित आरोपींची नावे आहेत.
हे तिघेहीविक्रीच्या उद्देशाने हा प्रतिबंधित अंमली पदार्थ सोबत बाळगून होते. हायड्रोपोनिक गांजा हा कृत्रिम वातावरणात (इनडोअर) अत्यंत हाय-टेक पद्धतीने उगवला जाणारा गांजाचा प्रकार मानला जातो, ज्याची बाजारात मोठी किंमत असते. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून (MH 08 AZ 8218)क्रमांकाची एक दुचाकी आणि (MH 08 BC 0150 )क्रमांकाची एक प्रवासी रिक्षा देखील जप्त केली आहे, ज्यांचा वापर तस्करी किंवा वाहतुकीसाठी होत असल्याचा संशय आहे.
​या प्रकरणी तिन्ही संशयित आरोपींविरोधात अंमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हायड्रोपोनिक गांजाचा स्रोत कुठे आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याबाबत रत्नागिरी शहर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
​ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आकांक्षा यादव, परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी केली.