पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील पहिले, तर रत्नागिरी जिल्ह्यातील २३ वे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण दिनांक ५ व ६ ऑक्टोबर रोजी भांबेड येथे पार पडले.
‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय भांबेड येथे आयोजित सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य
उमेश (दादा) पत्की तसेच जन आरोग्य समिती सदस्या भांबेड सौ. ग्रीष्मा गुरव, सदस्य राजेंद्र गांधी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लांजा यांचे प्रतिनिधी, तसेच प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय, भांबेडचे मुख्याध्यापक वाय. सी. मुल्लाणी हे उपस्थित होते. प्रशिक्षणाची सुरुवात आरोग्याची देवता श्री धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सदर प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी येथील श्री. लिंगायत आणि त्यांच्या पथकाने ‘प्रशिक्षणात अनावश्यक रुग्णसंदर्भ कमी करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावरच अधिकाधिक आरोग्य समस्यांचे प्रभावी व्यवस्थापन व उपचार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या प्रशिक्षणांतर्गत १३ प्रकारच्या सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षणास जिल्हा परिषद सदस्या
सौ. मनीषा लाखन यांनीही भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समिती सभापती सौ. मानसी आंबेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे, डॉ. शरण काठोळे यांनीही प्रशिक्षणास उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, भांबेडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल पाटील यांच्यासह आरोग्य निरीक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक आणि आशासेविका तसेच इतर प्रा.आ.केंद्रातील कर्मचारी देखिल उपस्थित होते. सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी,कर्मचारी ,परिचर व मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
समारोपानंतर प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रशिक्षणाची सांगता झाली













