राजापुरात मन हेलावून टाकणारी दुर्घटना : एका मुलीचा शोध सुरू
आई-वडिलांसोबत कालवे काढण्यासाठी गेली होती मुले; खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ओढवला भयंकर प्रसंग
राजन लाड । जैतापूर
राजापूर तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटे अंतर्गत येणाऱ्या नाणार इंगळवाडी येथे रविवारी दुपारी काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. खाडीत मुळे (कालवे) काढण्यासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच मुले खाडीच्या खोल पात्रात बुडाली. यातील एका मुलीला वाचवण्यात यश आले असले, तरी एका मुलासह तीन मुली अशा चार निष्पाप भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एका मुलीचा शोध अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंगळवाडी येथील श्री. जुनेद भाटकर यांची पत्नी हिना भाटकर या आपल्या मुलांसह रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजण्याच्या सुमारास नाणार परिसरातील खाडीमध्ये मुळे व कालवे काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील खाडीपात्रात कालवे काढत असताना, दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या पात्रातील एका खोल खड्ड्याचा अंदाज मुलांना आला नाही. एकापाठोपाठ एक अशी पाचही लहान मुले खाडीच्या खोल पाण्यात ओढली गेली. मुलांचा आरडाओरडा ऐकून त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामध्ये एका लहान मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले; मात्र इतर चार भावंडे पाण्याच्या खोल प्रवाहात बुडाली.
मृतांची नावे :
१. मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे, मुलगा) – मृतदेह प्राप्त
२. जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे, मुलगी) – मृतदेह प्राप्त
३. बुशिरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे, मुलगी) – मृतदेह प्राप्त
४. माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे, मुलगी) – शोधमोहीम सुरू
प्रशासन व पोलिसांकडून शोधमोहीम वेगाने सुरू
घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या साहाय्याने तातडीने बचाव व शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यातून मोहम्मद (६), जुहेरिया (९) आणि बुशिरा (११) या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत, तर १५ वर्षीय माहिरा भाटकर हिचा शोध अद्याप खाडीपात्रात युद्धपातळीवर सुरू आहे.
एकाच घरातील चार निष्पाप मुलांवर काळाने घाला घातल्याने इंगळवाडीसह संपूर्ण नाणार आणि राजापूर परिसरात तीव्र शोककळा पसरली असून भाटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसरात शांतता आहे. या घटनेची माहिती मिळताच नाटेसागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांसह त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले स्थानिक तसेच पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले













