इंजिनच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका
सर्व खलाशांना वाचवण्यात यश; मोठा अनर्थ टळला
Devgad : प्रतिनिधी
देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या देवगड येथील ‘भगवती कृपा’ या मासेमारी नौकेला इंजिनच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली. या दुर्घटनेमुळे बोटीवरील खलाशांमध्ये एकच धावपळ उडाली. मात्र, वेळेवर मदत मिळाल्याने नौकेवरील सर्व २५ खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
कुणकेश्वर कातवण येथील संतोष रमेश पेंडणेकर यांच्या मालकीची ‘भगवती कृपा’ ही नौका मासेमारीसाठी देवगड समुद्रात गेली असताना ही घटना घडली. नौकेच्या इंजिनमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. समुद्रात नौकेला आग लागल्याचे समजताच बोटीवरील खलाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, वेळीच मदत मिळाल्याने सर्व २५ खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या घटनेत सर्व खलाशी सुखरूप बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. देवगड समुद्रात घडलेल्या या दुर्घटनेमुळे मासेमारी नौकेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आगीच्या दुर्घटनेतील नौकेचे नाव ‘भगवती कृपा’ असून, तिचा नोंदणी क्रमांक IND-MH-5-MM-1614 असा आहे. ही नौका कुणकेश्वर कातवण येथील संतोष रमेश पेंडणेकर यांच्या मालकीची आहे.












