खाकीवर्दीभोवती संशयाचा भोवरा…!

कणकवली पोलिस स्टेशनच्या पोलिस हवालदार स्मिता माने यांचा तीन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यु झाला. हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यु प्रकरणात त्यांचे पती पोलिस सचिन माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्युने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
हवालदार स्मिता माने आणि पोलिस सचिन माने हे दांपत्य कणकवली पोलिस स्टेशनमध्ये सेवेत होते. या दोघांची आठवडाभरापूर्वीच वैभववाडी पोलिस स्टेशनला बदली झाली होती. ही घटना घडली त्या पुढील दोन दिवसात स्मिता माने आणि सचिन माने वैभववाडी पोलिस स्टेशनला बदलीच्या ठिकाणी हजरही होणार होते. घरातील सामानाची त्यांनी बांधा-बांधही त्यांनी केली होती. त्यामुळे जो काही पती-पत्नीमध्ये वाद झाला असेल हा वाद का कशासाठी झाला अशा अनेक प्रश्नांची मालिका तयार होते. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना नि:पक्षपातीपणे करण्याची आवश्यकता आहे. यात कुणालाही वाचवण्याच्या दिशेने तपास होता कामा नये .याप्रकरणात काहीही झाल तरी खाकीवर्दीवर अन्याय झाला अस होता कामा नये. हवालदार स्मिता माने यांचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे या जंगलमय परिसरात सापडला आहे. बिडवाडी येथील संदिप चव्हाण यांच्या काजू बागेत काजूच्या झाडाला कापडी गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. १० ऑक्टोबर रोजी पती कॉन्स्टेबल सचिन माने याने पत्नी स्मिता माने हीच्या अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली होती. कॉन्स्टेबल सचिन माने यांनी आपली पत्नी स्मिता माने या गायब असल्याची पोलिसात तक्रार दाखल न करता पत्नी स्मिताचे अपहरण झाल्याची फिर्याद पती सचिन माने यांनी का ? कशासाठी केली यातूनही या प्रकरणात संशय बळावत आहे. यातच पती सचिन माने यांने ‘‘मी खूप चुकलोय, ये परत….. बाबू आजारी आहे. तो वाट बघतोय असा स्टेटस सचिन माने यांने ठेवला होता. एकीकडे या संपूर्ण प्रकरणात हवालदार स्मिता माने यांना पती सचिन माने यांने पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. स्मिता माने प्रकरणात संशयाची सुई पती सचिन माने याच्या दिशेने जात आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे तपास दिला आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक विकास बडवे या प्रकरणात कसा तपास करणार हे पहाणं महत्वाच ठरणार आहे. बहुतांशवेळा जेव्हा एखाद्या प्रकरणात खाकीवर्दीतला कोणी संशयीत आरोपी असतो तेव्हा त्या खाकीवर्दीला वाचवण्यासाठी अनेकांची डोकी राबत असतात. आपला कायदा त्यातील पळवाटा शोधण्यात अनेक माहिर आहेत. त्यामुळे या प्रकरणातही तेच घडण्याची शक्यता अधिक आहे. यात आजच्या घडीला शवविच्छेदन कोल्हापूर सीपीआरमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर यातल्या बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणे अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणातील सत्यता लोकांसमोर येण्याची आवश्यकता आहे. स्मिता माने यांच्या मृत्यु प्रकरणात जे मुद्दे समोर येत आहेत. काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरही मिळून जातील. स्मिता माने मृत्यु प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी. न्यायालयीन प्रक्रियेतही कोणतेही कायद्याच्या पळवाटातून कोणी सुटणार नाही याची काळजी, दक्षता तपास करणाऱ्या पोलिसांची आहे. खरंतर हवालदार स्मिता माने मृत्यु प्रकरणाचा तपास सिंधुदुर्ग पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. पोलीसांनी सचिन माने यांच्या विरोधात पत्नीला आत्महत्या करण्याचा प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल केला असला तरीही तपास अधिकारी बडवे यांनी सखोल तपास केला पाहिजे.कणकवली पोलीस स्टेशन मधील काही पोलीसांना या प्रकरणी काही माहिती आहे का ?याचा तपासही केला पाहिजे.पोलिस या प्रकरणात कुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात की सत्यता तपासात उघड करुन या संपूर्ण प्रकरणाचा पर्दापाश करतात हे येणारा काळ ठरवणार आहे.