वंदे मातरम्’मधील ‘सुजलाम्’ शब्दातून भारतीय जलसंस्कृतीचा उलगडा

धनंजय चितळे यांनी प्राचीन जलज्ञान, नद्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि जलसंवर्धनाचे सांगितले महत्त्व

चिपळूण (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या वतीने आयोजित ‘नवरात्र भारतमातेचे’ या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प भारतीय संस्कृतीचे अभ्यासक धनंजय चितळे यांनी गुंफले. ‘वंदे मातरम्’ या गीतातील ‘सुजलाम्’ या शब्दाचे विविध अर्थ, भारतीय संस्कृतीतील जलाचे स्थान, नद्यांचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व तसेच प्राचीन भारतातील जलव्यवस्थापनाचे ज्ञान यांचे सखोल विवेचन त्यांनी यावेळी केले. एका शब्दाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील जलविषयक समृद्ध परंपरेचा वेध घेणारे हे व्याख्यान उपस्थितांसाठी ज्ञानवर्धक ठरले.
‘सुजलाम्’ या शब्दाचा अर्थ केवळ विपुल पाणी असलेला प्रदेश एवढाच मर्यादित नसून, पवित्र जलाने समृद्ध असलेला प्रदेश असाही त्याचा अर्थ होतो, असे श्री धनंजय चितळे यांनी स्पष्ट केले. भारतभूमीचे वर्णन करताना वापरलेला हा शब्द भौगोलिक समृद्धीबरोबरच जलाचे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि जीवनोपयोगी महत्त्व अधोरेखित करतो. आपल्या परिसराचे डोळसपणे परिभ्रमण करून निसर्ग, नद्या, जलस्रोत आणि त्यांच्याशी जोडलेल्या परंपरा समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. पाच हजार वर्षांपूर्वीच्या भारतीय जलज्ञानाचा संदर्भ प्राचीन भारतातील कृषिज्ञानाची माहिती देताना त्यांनी इसवी सनपूर्व तिसऱ्या सहस्रकातील पाराशर ऋषी आणि त्यांच्याशी संबंधित ‘कृषिपाराशर’ या ग्रंथाचा संदर्भ दिला. या ग्रंथामध्ये जलसंधारण, पर्जन्यमापन आणि शेतीशी संबंधित विविध बाबींचे विवेचन आढळते. यावरून प्राचीन भारतीय समाजात पाऊस, पाणी आणि कृषीव्यवस्थापन यांविषयी किती सूक्ष्म निरीक्षणे आणि ज्ञानपरंपरा विकसित झाल्या होत्या, हे लक्षात येते, असे त्यांनी सांगितले.
आज शालेय अभ्यासक्रमातून शिकविल्या जाणाऱ्या जलचक्राच्या संकल्पनेचा संदर्भ देताना त्यांनी ऋग्वेदातील ‘जलमेघचक्र’ या उल्लेखाकडे लक्ष वेधले. वेद आणि पुराणांमध्ये नद्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे महत्त्व आणि जलाचे जीवनातील स्थान याविषयी विविध प्रकारे विवेचन करण्यात आले आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत निसर्गाचे निरीक्षण, पाण्याचे महत्त्व आणि मानवी जीवनातील त्याची अनिवार्यता यांचा विचार प्राचीन काळापासून केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नदी म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नव्हे, तर संस्कृतीचा आधार स्कंदपुराणातील नदीमहात्म्याचे संदर्भ तसेच देवी भागवतातील यम आणि सावित्री यांच्या कथांच्या अनुषंगाने चितळे यांनी जलाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशद केले. निरपेक्ष भावनेने जलाशय अर्पण आणि जल संरक्षण करणे हे पुण्यकर्म मानले गेले आहे. पाण्याचे दान, जलस्रोतांचे जतन आणि लोकहितासाठी जलव्यवस्था निर्माण करणे या बाबींना भारतीय परंपरेत विशेष महत्त्व दिले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. नद्यांविषयीच्या धार्मिक श्रद्धांबरोबरच त्यांचे स्वच्छतेच्या दृष्टीने जतन करण्याचाही संदेश पुराणपरंपरेतून दिला जातो. नदीमध्ये निर्माल्य टाकू नये, नदी अस्वच्छ करू नये, तसेच नदीच्या किनारी वादविवाद करू नयेत, अशा सूचनांचे दाखले त्यांनी दिले. त्यामुळे नद्यांविषयीची भारतीय परंपरा केवळ पूजाअर्चेपुरती मर्यादित नसून, त्यामध्ये नदीचे पावित्र्य, स्वच्छता आणि सामाजिक आचारधर्म यांचाही समावेश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गंगा आणि यमुना या नद्यांच्या प्रतीकात्मक महत्त्वाचे विवेचन करताना त्यांनी गंगा ही ज्ञानाचे, तर यमुना ही भक्तीचे प्रतीक असल्याची संकल्पना मांडली. पाण्यामध्ये देवाचे अस्तित्व मानले जाते, तेव्हा ते ‘तीर्थ’ ठरते; जमिनीवर देवाचे अस्तित्व असते, तेव्हा ते ‘क्षेत्र’ ठरते; तर पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी देवाचे अस्तित्व जोडले जाते, तेव्हा त्या स्थानाला ‘तीर्थक्षेत्र’ म्हणतात, अशी सुंदर संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. नद्यांचे उत्सव आणि इतिहासाशी जोडलेली लोकश्रद्धा भारतीय संस्कृतीमध्ये विविध नद्यांचे जन्मोत्सव आणि नदीपूजनाच्या परंपरा आजही जपल्या जातात आणि त्याला धार्मिक संदर्भही आहेत. यापैकीच इतिहासाशी असलेला संबंध स्पष्ट करताना श्री धनंजय चितळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि कृष्णा नदीशी संबंधित लोकपरंपरेचा उल्लेख केला. अफझलखान स्वराज्यावर चालून आला असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी कृष्णा नदीच्या तीरावरील गावांमधील लोकांनी कृष्णामाईला साकडे घातल्याची लोकपरंपरा त्यांनी सांगितली. महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर कृष्णामाईचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
आजही शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने कृष्णा नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये कृष्णामाईचा उत्सव साजरा केला जातो. इतिहास, लोकश्रद्धा आणि नदी यांच्यातील भावनिक नाते या परंपरेतून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा, कोयना आणि वेण्णा या नद्यांच्या संगमाचे वर्णन करताना श्री टेंब्ये स्वामी यांनी वापरलेल्या अलंकारिक उपमांचाही त्यांनी उल्लेख केला. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमाला त्यांनी पिता-पुत्रांच्या भेटीची, तर कृष्णा आणि वेण्णा यांच्या संगमाला दोन मित्रांच्या भेटीची उपमा दिली होती. नद्यांच्या संगमाकडे केवळ भौगोलिक घटना म्हणून न पाहता त्यातील भावबंध आणि सांस्कृतिक सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी या उपमांमधून दिसून येते. याच संदर्भात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सिंधू नदीवर केलेल्या काव्याचाही उल्लेख करण्यात आला. नदी, मातृभूमी आणि भारतीय सांस्कृतिक अस्मिता यांच्यातील नाते साहित्याच्या माध्यमातून कसे व्यक्त होते, याची जाणीव या संदर्भातून झाली. ग्रंथालय म्हणजे संस्कारांचे केंद्र व्याख्यानाच्या उत्तरार्धात चितळे यांनी ग्रंथालयाच्या सामाजिक भूमिकेवर भाष्य केले. ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांची देवघेव करणारी संस्था नव्हे, तर ज्ञान, संस्कार, विचार आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण करणारे केंद्र आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने जतन करण्यात आलेले वस्तुसंग्रहालय आणि कलादालन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारून या ज्ञानचळवळीचा भाग व्हावे, असेही त्यांनी सांगितले. ग्रंथालयांच्या माध्यमातून इतिहास, संस्कृती, साहित्य आणि सामाजिक मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. स्वरा केळकर यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताचे सुरेल गायन सादर केले. त्यांच्या भावपूर्ण गायनाने आजच्या व्याख्यानाची सांगता झाली. ‘वंदे मातरम्’मधील ‘सुजलाम्’ या एका शब्दाच्या निमित्ताने प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा, जलसंवर्धन, नद्यांचे सांस्कृतिक महत्त्व, इतिहास आणि ग्रंथालयांची सामाजिक भूमिका अशा विविध विषयांचा वेध घेणारे हे व्याख्यान व्याख्यानमालेतील महत्त्वपूर्ण पुष्प ठरले.