पोलीस महासंचालक आणि राज्य शासनाचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय
सिंधुदुर्गात ६० सागरी होमगार्ड कार्यरत, आणखी १०० नियुक्तींना मंजुरी
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर देश-विदेशातील पर्यटकांची वाढती गर्दी आणि समुद्राच्या अनपेक्षित प्रवाहामुळे घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आणि राज्य शासनाने उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण ठरत आहे. किनारपट्टीवर केवळ गस्त आणि सुरक्षेपुरतीच नव्हे, तर संकटात सापडलेल्या पर्यटकांचे प्राण वाचविण्यासाठीही आता सागरी होमगार्डचे सक्षम कवच उभे राहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दहा याप्रमाणे ६० सागरी होमगार्ड कार्यरत असून, पर्यटकांच्या सेवेसाठी आणखी १०० होमगार्ड नियुक्त करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पर्यटनवृद्धीसोबत पर्यटकांची सुरक्षितता आणि आपत्कालीन बचावव्यवस्थेला प्राधान्य देणारा हा निर्णय सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग म्हणजे निळाशार समुद्र, निसर्गरम्य किनारे, नारळी-पोफळीच्या बागा आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण! मात्र, समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने किंवा पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने पर्यटकांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना घडतात. अशा वेळी मदतीसाठी तातडीने प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असते. ही गरज ओळखून सागरी सुरक्षेसाठी होमगार्डची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे किनाऱ्यांवर सुरक्षा यंत्रणेची उपस्थिती वाढण्याबरोबरच संकटाच्या क्षणी तातडीने मदत मिळण्यास हातभार लागणार आहे.
आचरा किनाऱ्यावर होमगार्ड ठरले देवदूत!
शासनाच्या या निर्णयाचे महत्त्व आचरा समुद्रकिनाऱ्यावर नुकत्याच घडलेल्या घटनेतून अधोरेखित झाले. मुंबईहून पर्यटनासाठी आलेली एक व्यक्ती १३ ऑक्टोबर रोजी आचरा समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या प्रवाहात अडकून बुडू लागली. सागरी सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्नांनी त्यांनी संबंधित पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचविले.
या धाडसी कामगिरीबद्दल बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या हस्ते दोन्ही होमगार्डचा सन्मान करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपस्थित होत्या. नितेश गुरव हे २०१९ पासून, तर अनिकेत परब हे २०२४ पासून होमगार्ड म्हणून सेवा बजावत असून, दोघेही सध्या कणकवली होमगार्ड पथकात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रसंगावधानाने आणि धाडसाने सागरी होमगार्डची भूमिका केवळ सुरक्षेपुरती मर्यादित नसून, संकटातील पर्यटकांसाठी जीवनरक्षक ठरू शकते, हे सिद्ध केले आहे.
किनारपट्टीच्या सुरक्षेला शासनाचे बळ
विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा व सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग यांच्या पुढाकाराने १० जून २०२६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६० सागरी होमगार्ड कार्यरत झाले आहेत. जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी दहा होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत. किनारपट्टीवर गस्त घालणे, संशयास्पद बोटी व व्यक्तींवर लक्ष ठेवणे, मच्छिमारांकडून गोपनीय माहिती संकलित करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करणे, अशी त्यांची प्रमुख कर्तव्ये आहेत.
आता आणखी १०० होमगार्ड नियुक्त करण्यास मिळालेल्या मंजुरीमुळे सागरी सुरक्षेच्या व्यवस्थेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पर्यटन हंगामात समुद्रकिनाऱ्यांवर वाढणारी गर्दी, जलक्रीडा आणि समुद्रात उतरणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता या बाबी लक्षात घेता हे मनुष्यबळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पर्यटकांना वेळेत मदत मिळणे, संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी दक्षता घेणे आणि किनारपट्टीवरील सुरक्षेचा विश्वास वाढविणे यासाठी या नियुक्त्या उपयुक्त ठरतील.
पर्यटनविकासासोबत पर्यटकांच्या जीवाचीही काळजी!
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी क्षमता असून, देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किनारपट्टीवरील सुरक्षितता हा महत्त्वाचा घटक आहे. पर्यटनस्थळांचा विकास, पायाभूत सुविधा आणि निसर्गसौंदर्याबरोबरच पर्यटकांच्या जीविताचे संरक्षण करणारी सक्षम यंत्रणा उभी राहणेही तितकेच गरजेचे आहे. सागरी होमगार्डच्या नियुक्त्या आणि आणखी १०० होमगार्डना मंजुरी हा त्याच दिशेने टाकलेला महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
पोलीस महासंचालक आणि राज्य शासनाने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गची ओळख देश-विदेशात अधिक व्यापक होत असताना, पर्यटकांना सुरक्षिततेची हमी देणारी यंत्रणा उभी राहणे जिल्ह्याच्या पर्यटनविकासासाठी आश्वासक ठरणार आहे. आचरा किनाऱ्यावर दोन होमगार्डनी दाखविलेल्या धाडसाने या निर्णयामागील मानवी संवेदना आणि सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.













