मालवण व राधानगरी पोलिसांची तत्परता ;
तरुणीला आई-वडिलांच्या केले स्वाधीन
अमित खोत | मालवण : राधानगरी येथून घरातून निघून आलेली १९ वर्षीय तरुणी मालवणमधील दांडी समुद्रकिनाऱ्यावरील दांडेश्वर मंदिर परिसरात सुखरूप आढळून आली. राधानगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालवण पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत तरुणीचा शोध घेतला. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले. मालवण पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कार्यवाहीचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी येथील या तरुणीचा घरातील मंडळींसोबत किरकोळ वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात ती एकटीच घराबाहेर पडली. सोबत मोबाईल पण घेतला नव्हता. त्यानंतर ती राधानगरी बसस्थानकात पोहोचली आणि तेथून वेंगुर्ले येथे जाणाऱ्या बसने मंगळवारी रात्री वेंगुर्ले गाठले. बुधवारी सकाळी प्रवास करत ती मालवणमध्ये दाखल झाली.
मालवणमध्ये आल्यानंतर ती दांडी समुद्रकिनाऱ्यावरील दांडेश्वर मंदिर परिसरात थांबली. यावेळी तेथील एका नागरिकाच्या मोबाईलवरून तिने काही दूरध्वनी केले. या फोनसंदर्भातील माहिती राधानगरी पोलिसांना मिळाल्यानंतर कॉल लोकेशनच्या आधारे मालवण पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. दरम्यान, संबंधित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार राधानगरी पोलीस ठाण्यात आधीच दाखल असल्याने तेथील पोलीस तिचा शोध घेत होते.
तरुणीने मालवणमधून फोन केल्याची माहिती मिळताच मालवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडित पाटील आणि सहायक पोलीस गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने हालचाली केल्या. पोलीस कर्मचारी अभिजित भोसले, अमीर मुजावर, करिश्मा चिंदरकर आणि रामेश्वर करे यांनी दांडी येथील दांडेश्वर मंदिर परिसरात शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान संबंधित तरुणी पोलिसांना सुखरूप आढळून आली.
त्यानंतर पोलिसांनी तिला मालवण पोलीस ठाण्यात आणले. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांनी तरुणीशी संवाद साधून तिचे सांत्वन केले आणि तिच्या पालकांशी संपर्क साधला. सायंकाळी उशिरा राधानगरी पोलीस ठाण्याचे पथक तरुणीच्या आई-वडिलांसह मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले.
आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. यावेळी आई-वडिलांना पाहून त्या तरुणीच्या अश्रूंचा बांध फुटला. क्षणाचा राग असल्याने घरातून निघालेली ती तरुणी आई-वडिलांना पाहून मी लागली बिलगली आपल्या चुकीची जाणीव तिला झाली.
दरम्यान, पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि समन्वयामुळे बेपत्ता तरुणी सुखरूप आपल्या कुटुंबीयांकडे परतली. या कार्यवाहीबद्दल मालवण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.













