विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांच्या तक्रारींची मत्स्यव्यवसाय विभागाकडून दखल
दुर्गंधी व अपघातांचा धोका टाळण्यासाठी वाहनधारकांना सूचना; उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा
देवगड : प्रतिनिधी
देवगडमधील विठ्ठलवाडी परिसरात मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून बर्फ वितळल्यानंतर तयार होणारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याच्या तक्रारींची मत्स्यव्यवसाय विभागाने दखल घेतली आहे. हे पाणी रस्त्यावर सांडल्यामुळे दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण होत असून परिसरात दुर्गंधीही पसरत आहे. या पार्श्वभूमीवर सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी, देवगड यांनी मासळी व्यापारी, वाहतूक वाहनधारक, नौकामालक आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना सूचना देऊन त्यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
विठ्ठलवाडी मित्र मंडळाने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागाने हे पत्र जारी केले आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी काढलेल्या या पत्रात मासळी वाहतुकीदरम्यान योग्य खबरदारी घेतली जात नसल्यामुळे रस्त्यावर दूषित पाणी सांडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मासळी ताजी ठेवण्यासाठी वाहतूक वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फाचा वापर केला जातो. मात्र, बर्फ वितळल्यानंतर तयार होणारे पाणी वाहनातून रस्त्यावर सांडत असल्याने रस्त्यावर निसरडेपणा निर्माण होतो. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना घडल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी अशा घटनांमध्ये दुखापती झाल्याच्या बाबीही समोर आल्याने भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून बर्फ वितळून तयार होणारे दूषित अथवा दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा नगरपंचायत व ग्रामपंचायत हद्दीत सोडू नये, अशा स्पष्ट सूचना विभागाने दिल्या आहेत. या पाण्याची विल्हेवाट संबंधित नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीच्या निर्देशानुसार ठरवून दिलेल्या ठिकाणीच करावी, असेही कळविण्यात आले आहे.
वाहनांमध्ये मासळी व बर्फ ठेवताना योग्य प्रकारे झाकण आणि सुरक्षिततेची व्यवस्था करावी, जेणेकरून वाहतुकीदरम्यान पाणी रस्त्यावर सांडणार नाही. सार्वजनिक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना तसेच मानवी वस्तीत दुर्गंधी निर्माण करणारे किंवा अपघातास कारणीभूत ठरू शकणारे दूषित पाणी सोडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या सूचनांची माहिती संबंधित मासळी वाहतूक वाहनांचे चालक व मालक यांना देण्याची विनंती मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना करण्यात आली आहे. सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाहनधारक, चालक किंवा मालक यांच्यावर वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई होऊ शकते, असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.
सार्वजनिक रस्त्यांवरील सुरक्षितता, परिसरातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन सर्व संबंधितांनी या सूचनांचे तात्काळ व काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी कि. मा. वाघमारे यांनी केले आहे.












