पोलिसांची सायबर गुन्हेगारांवर मोठी कारवाई
रत्नागिरी: शेअर मार्केट आणि आयपीओ ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि कौशल्याच्या बळावर पोलिसांनी तब्बल ११ लाख ३७ हजार १४ रुपयांच्या सायबर फसवणुकीचा छडा लावत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. दादासाहेब चौगुले (रा. सोलापूर) आणि तुषार चौधरी (रा. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नेमकी घटना काय?
सायबर भामट्यांनी फिर्यादी महिला व त्यांच्या पतीशी सुरुवातीला व्हॉट्सॲपद्वारे (WhatsApp) संपर्क साधला होता. संभाषणातून त्यांचा पूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर, आयपीओ (IPO) तसेच ओटीसी (OTC) ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींच्या या भूलथापांना बळी पडून संबंधित दाम्पत्याने विविध बँक खात्यांवर वेळोवेळी एकूण ११ लाख ३७ हजार १४ रुपये भरले. मात्र, रक्कम जमा झाल्यानंतर परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ०५/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
तांत्रिक कौशल्याच्या जोरावर रचला सापळा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक खात्यांच्या व्यवहारांचा मागोवा (Money Trail) आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सखोल तपास सुरू केला. या तपासात मनी ट्रेल सोलापूर येथील दादासाहेब चौगुले याच्याशी जोडलेला असल्याचे आणि ऑपरेटर ट्रेल धाराशिव येथील तुषार चौधरी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शिताफीने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. दोघांना रत्नागिरी येथे आणून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपास पथकाची धडक कामगिरी
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोलीस हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल आदर्श इंगवले यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
“शेअर मार्केट, ट्रेडिंग व ऑनलाइन गुंतवणुकीत अल्पावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून अत्यंत सावध राहा. अनोळखी व्यक्ती, बनावट ॲप्स, व्हॉट्सॲप अथवा टेलिग्राम ग्रुप्सवर दिल्या जाणाऱ्या टिप्सवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तिची सत्यता आणि संस्था अधिकृत असल्याची खात्री करून घ्या. जास्त परताव्याचे आमिष हा फसवणुकीचा मोठा इशारा असू शकतो. फसवणूक झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.” — नितीन बगाटे, पोलीस अधीक्षक













