जिमखाना मैदानावर लॉन कटिंगला होणार मदत ; खेळाडूमधून समाधान
सावंतवाडी:सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने नवीन लॉन मोअर मशीन खरेदी करण्यात आले असून आज प्रत्यक्ष जिमखाना मैदानावर त्याचा शुभारंभ करण्यात आला. या मशीनच्या सहाय्याने जिमखाना मैदानातील टर्फ विकेटवरील लॉन कटिंगचे काम सहजतेने पार पडणार असल्याने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नवीन मशीन दाखल झाल्यानंतर आज जिमखाना मैदानावर प्रत्यक्ष लॉन कटिंगच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडी पालिकेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी आणि उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांच्यासह जिमखाना मैदानातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांनी सांगितले की, या अत्याधुनिक लॉन मोअर मशीनमुळे मैदानातील लॉन कटींगचे काम अत्यंत सोपे आणि जलद होणार आहे. तसेच जिमखाना मैदानातील टर्फ विकेटचे कामही येत्या काही दिवसांत पूर्ण केले जाईल. यामुळे स्थानिक खेळाडूंना मैदानावर सरावासाठी आवश्यक आणि दर्जेदार सुविधा वेळेत उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.













