सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत डंपर (एम एच ०७ सी ६१९८) पूर्णतः जळून खाक झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या बंबाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत डंपरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.
प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा डंपर चिरे वाहतूक करण्यासाठी कसाल येथे जात होता. यावेळी चालक वासुदेव भगवान तळवणेकर (रा. मळेवाड, सावंतवाडी) यांनी झाराप येथील पेट्रोलपंपावर इंधन भरले. त्यानंतर डंपर कसालच्या दिशेने मार्गस्थ झाल्यावर बिबवणे येथे डंपरचा जॉइंट तुटला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत गाडीवर नियंत्रण मिळवले. मात्र, भीषण आगीने रौद्र रूप धारण केल्याने. डंपर आगीत जाळून खाक झाला. घटनास्थळी कुडाळ पोलीस, कुडाळ नगरपंचायत अग्निशमन दल, कुडाळ एम.आय.डी.सी. अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत डंपर जाळून खाक झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.













