वझरे गावाला न्याय मिळवून देणार!

​वेदांता कंपनीच्या बोअरवेल आणि प्रदूषणप्रश्नी संजू परब यांचे ग्रामस्थांना आश्वासन; गावात तीव्र संताप

​दोडामार्ग: सुहास देसाई

वेदांता कंपनीच्या बोअरवेलमुळे भूजल पातळी घटली असून परिसरातील नदी आटत चालल्याचा गंभीर आरोप वझरे परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीविरोधात शुक्रवारी तहसीलदारांसोबत बैठक घेतली जाईल, असे शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ग्रामस्थांना सांगितले. “फक्त चर्चेने हा प्रश्न सुटणार नाही, कंपनीच्या अटींची पूर्तता झाली आहे का? याची विचारणा करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना बोलावून घेऊ आणि या गावाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी,” असा विश्वास त्यांनी वझरे येथील ग्राममंदिरात आयोजित बैठकीत ग्रामस्थांना दिला.

​तसेच, कंपनीच्या कोणत्याही आमिषांना बळी न पडता “आम्हाला येथे कंपनी नको” ही ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला पंचायत समितीचे उपसभापती तथा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, बाळा नाईक, सज्जन धाऊस्कर, पिकुळे सरपंच आपा गवस, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, आंबडगाव सरपंच स्नेहा गवस, विठोबा पालयेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

​बोअरवेलमुळे पाणी घटल्याचा ग्रामस्थांचा आरोप
​बैठकीत ग्रामस्थांनी वेदांता कंपनीविरोधातील आपली कैफियत मांडली. कंपनीच्या बोअरवेलमुळे परिसरातील पाण्याची पातळी कमी झाली असून जिवंत नदीही आटत चालल्याचे त्यांनी सांगितले. या नदीवर पंचक्रोशीतील अनेक गावांची पाण्याची गरज अवलंबून असल्याने तिच्या प्रवाहावर होणारा परिणाम चिंताजनक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
​कंपनीला दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) मुदत संपली असून, यापुढे एनओसी देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. त्यावर संजू परब यांनी ग्रामस्थांनी एनओसी न देता त्याबाबत विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करावा, असे सुचवले.

​”प्रदूषणच मिळणार असेल, तर कंपनीचा उपयोग काय?”
​यावेळी बाळा नाईक यांनी कंपनीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपनीचे प्रतिनिधी ग्रामस्थांच्या प्रश्नांना थातुरमातुर उत्तरे देऊन विषय टाळतात. स्थानिकांना कोणताही फायदा न होता जर गावाला केवळ प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असेल, तर अशा कंपनीचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर कंपनी चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

​तसेच, गणेशप्रसाद गवस यांनी मनोगतात सांगितले की, गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ एकत्र आले असून कंपनीमुळे फायदा होत नसेल तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. ग्रामस्थांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.