रत्नागिरी विशेष प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यात विविध भागात चोरटयांनी धुमाकुळ घातला आहे. अनेक ठिकाणी घरफोडया करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबविण्याचे प्रकार घडत असून या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, चोरट्यांना रोखण्याचे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जिल्हयात राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, गुहागर तालुक्यात गेल्या महिनाभरात विविध ठिकाणी चोरटयांनी घरफोडया करत मौल्यवान वस्तू आणि रोकड लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या चोऱ्यांचा तपास लावण्यात जिल्हयातील पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही.
या चोऱ्यांच्या घटनांनंतर पोलीसांकडून अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हे दाखल केले जातात, पोलिसांकडून तपास सुरू केला जातो. मात्र अद्याप पर्यंत या चोरटयांना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आलेले नाही. गेले काही दिवस वारंवार जिल्हयात चोरीच्या घटना घडत असल्याने जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजापूर तालुक्यात पाचल, खरवते आणि ओणी-कोंडिवळे येथे घरफोडी झाली आहे. खेड तालुक्यात वेरळ येथील समर्थ कृपा विश्व परिसरात एकाच वेळी दोन बंगल्यांमध्ये घरफोडी झाली आहे. संगमेश्वर घाटीवळे आणि करंजारी येथे एकाच रात्री पाच बंद घरांमध्ये घरफोडी झाली तर गुहागर असगोली येथे चोरीच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी शहर व परिसर मजगाव रोडवरील व मिरजोळे एमआयडीसी परिसरात घरफोडी झाली आहे. तर चिपळूण तालुक्यात मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथे घरफोडीची घटना झाली होती, या प्रकरणात संशयित आरोपीला अटक करण्यात आली होती. तर लांजा तालुक्यातही गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र यातील अनेक चोऱ्यांचा तपास लागलेला नाही. काही किरकोळ चोऱ्यांची पोलीस दप्तरी नोंदही होत नाही.
गेले काही दिवस जिल्हयात चोरटयांनी उच्छांद मांडला आहे. बंद घरांना चोरटे लक्ष्य करत आहेत. त्यामुळे जनतेनेदेखील याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी घराजवळ सीसीटीव्ही बसविणे, मौल्यवान वस्तु, रोकड घरात न ठेवणे यासारखी काळजी घेणे आवश्यक आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे.
मात्र गेल्या काही दिवसांत जिल्हयात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे जनतेमध्ये काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने या चोऱ्यांचा लवकरात लवकर छडा लावून जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
सध्या शहरासह ग्रामीण भागात फेरीवाले, विविध प्रकारच्या वस्तुंच्या विक्रेत्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारे विक्रीसाठी येणाऱ्या परप्रांतिय विक्रेत्यांची नोंद त्या त्या पोलीस स्थानकात करणे आवश्यक आहे. तर गावात अशा प्रकारे फेरीवाल्यांना प्रतिबंध करणेही गावची जबाबदारी आहे. स्थानिक पातळीवर पोलीस पाटील यांनी याबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मात्र या वाढत्या चोऱ्यांच्या घटनामुळे जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी व या चोऱ्यांचा तपास लावून चोरटयांना जेरबंद करावे अशी जनतेची अपेक्षा आहे.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरी जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ : चोऱ्यांच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण चोऱ्यांचा...













