आडवेळवाडी येथे मंजूर झालेल्या ४५० मीटर लांबीच्या जिओट्यूब बंधाऱ्याचे भूमिपूजन….

निवती बंदर, श्रीरामवाडी व आडवेळवाडी परिसर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल : सचिन देसाई

परुळे : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील आडवेळवाडी येथे पत्तन विभाग, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत मंजूर झालेल्या ४५० मीटर लांबीच्या जिओट्यूब बंधाऱ्याचे भूमिपूजन वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. देसाई यांनी निवती गावाची भौगोलिक रचना आणि लाभलेले निसर्गाचे वरदान लक्षात घेता, निवती बंदर, श्रीरामवाडी आणि आडवेळवाडी हा परिसर पर्यटनाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

आडवेळवाडी येथील ४५० मीटर लांबीच्या जिओट्यूब बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित बंधाऱ्याची कामे हाती घेण्यात येतील. तसेच परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनही श्री. देसाई यांनी दिले. दरम्यान या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांना बळ मिळण्याबरोबरच पर्यटनवाढीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री नितेश राणे, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या सहकार्याने या भागातील अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत, असे त्यांनी सांगितले.

आडवेळवाडी येथील या बंधारा भूमिपूजन कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य विष्णु उर्फ आपा फणसेकर, मेढा ग्रामपंचायत सरपंच अवधूत रेगे, उपसरपंच प्रज्योत मेतर, म्हापण माजी सरपंच अभय ठाकूर, बांधकाम ठेकेदार सचिव अजीम अंसारी, सामाजिक कार्यकर्ते आबा कोचरेकर, मंगेश रावले, कुणाल रावले, ग्रामविकास अधिकारी शरद शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार आबा कोचरेकर यांनी मानले.