पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्राम व युवा प्रगती अभियानाचा शुभारंभ…
वेंगुर्ले : दाजी नाईक
शासनाच्या आदेशानुसार कृषिभूषण आबासाहेब ऊर्फ समाकांत मुकुंद कुबल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ले या संस्थेने मठ गाव दत्तक घेतले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्राम व युवा प्रगती अभियानांतर्गत ‘एक जिल्हा, एक गाव दत्तक योजना’ या योजनेचा शुभारंभ गुरुवारी ग्रामपंचायत मठ येथे सरपंच सौ. रुपाली नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सिंधुदुर्ग श्रीमती पी. पी. चव्हाण यांनी या दत्तक योजनेचे महत्त्व विशद केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्लेच्या वतीने संस्थेतील विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मठ ग्रामपंचायतीने या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या योजनेचा कालावधी तीन वर्षांचा असून, या कालावधीत गावामध्ये विविध विकासकामे राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये जलसंधारण, पारंपरिक जलस्रोतांचे पुनर्जीवन, माती-नाला बंधारे उभारणे, सार्वजनिक स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती, स्वच्छता मोहीम, डिजिटल साक्षरता आदी उपक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मठ येथील या कार्यक्रमाला ग्रामपंचायत मठचे सर्व पदाधिकारी, पोलिस अधिकारी आणि महिला बाल विकास विभागाचे कर्मचारी तसेच आयटीआय वेंगुर्लेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत मठच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. डी. डिसिल्वा, निदेशक यांनी केले, तर श्री. जे. एल. गवस यांनी आभार प्रदर्शन केले.













