वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्यात रविवारी सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी भात कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या शेतकऱ्यांची मात्र मोठी धावपळ उडाली. शेतात कापून ठेवलेले भात पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील भाताची आवराआवर करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. त्याचबरोबर दुचाकीस्वारांसह नागरिकांचीही तारांबळ उडाली.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भात कापणीच्या कामांना वेग आला होता. शेतकऱ्यांनी भात कापून ते शेतात वाळत घालण्यास सुरुवात केली होती. काही ठिकाणी भात कापणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, शेतकरी भाताची काढणी आणि मळणीची कामे उरकून घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, रविवारी सकाळपासूनच वातावरणात उष्णतेचे प्रमाण कमालीचे वाढले होते.

सायंकाळी सातनंतर पावसाची जोरदार हजेरी लावली
विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेले भात सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली.

सायंकाळच्या वेळी अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचीही मोठी धावपळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. दिवसभर उष्णतेचा सामना केल्यानंतर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची दैनंदिन कामेही विस्कळीत झाली. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.