वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र, भात कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अडचणीचा ठरत आहे. रविवारनंतर सोमवारीही पावसाने हजेरी लावल्याने कापणीची कामे विस्कळीत झाली असून, उरलेसुरले भातपीक सुरक्षितपणे घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
सोमवारी दिवसभर तालुक्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली होती. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाचा अनुभव आणि कृषी विभागाने दुपारनंतर पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकरी सतर्क झाले होते. पावसाची शक्यता लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी सकाळपासूनच भात कापणीच्या कामाला वेग दिला. दुपारपर्यंत कापणी करून कापलेले भात सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती.
मात्र, रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाने लवकरच हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ पडलेल्या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी भातशेतीच्या कामांवर त्याचा परिणाम झाला.












