चिपळूण (प्रतिनिधी) : मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचा मान चिपळूण मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला मिळालेला आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी चिपळूण येथील जिल्हा साहित्य संमेलनाच्या कार्यालयास आज भेट दिली.
दिनांक १२ व १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने नियोजित कार्यक्रमाचे स्वरूप व तयारी याबाबतचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत केशवसूत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष व कोमसाप केंद्रीय सदस्य सन्मा. गजानन (आबा) पाटील, कवी अरुण मोर्या, कवी-लेखक व कोमसाप केंद्रीय सचिव माधव अंकलके व कोमसाप जिल्हा सचिव, पत्रकार मुशताक खान उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संचालक प्रदीप पवार, गणेश सोनवणे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.













