सावंतवाडी:
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातार्डा पोलीस चेक पोस्ट येथे वाहनांची तपासणी करत असताना मंगळवारी संध्याकाळी चार वाजता पोलिसांनी बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची मोठी वाहतूक उघडकीस आणली. गोवा राज्यातून आंध्र प्रदेशकडे चाललेल्या एका आयशर कँटरवर धडक कारवाई करत पोलिसांनी ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सातार्डा चेक पोस्टवर पोलीस वाहनांची कसून तपासणी करत होते. त्यावेळी गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने येणारा एक आयशर कँटर चेक पोस्टवर आला. पोलिसांना या वाहनाचा संशय आल्याने त्यांनी गाडी रोखून तपासणी केली. कँटरच्या दर्शनी भागात पूर्णपणे पुठ्ठे भरलेले होते, ज्यामुळे बाहेरून केवळ पुठ्ठ्यांची वाहतूक सुरू असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. मात्र, संशय बळावल्याने पोलिसांनी पुठ्ठे बाजूला करून आत पाहिले असता दारूचे मोठे खोके लपवून ठेवल्याचे उघड झाले.
या कारवाईची माहिती मिळताच सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तातडीने सातार्डा चेक पोस्टवर धाव घेतली. पोलिसांनी कँटर ताब्यात घेऊन तो सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणला. सायंकाळी सातच्या सुमारास कँटरमधील सर्व साठा बाहेर काढण्यात आला. त्यात गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ५९७ बॉक्स सापडून आले. या दारूची एकूण किंमत ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला २० लाख रुपयांचा आयशर कँटरही पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी वेलूर, आंध्र प्रदेश येथील प्रदीप भास्कर रामाराव आणि व्यंकट नागराज बालम या दोघांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस कर्मचारी सुरेश धोत्रे, नागनाथ टक्केकर, निलेश नाईक, बर्गे आणि गवस यांच्या पथकाने केली. ही बेकायदा दारू आंध्र प्रदेशात नक्की कुठे आणि कोणासाठी नेली जात होती, याचा पुढील सखोल तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
Home ताज्या घडामोडी सावंतवाडीत ४३ लाखांची बेकायदा गोवा दारू जप्त; सातार्डा चेकपोस्टवर पोलिसांची धडक कारवाई,...












