पंचायत समिती सदस्य संग्रामशेठ कदम यांच्या पुढाकारातून जलसंधारणाचा आदर्श; देवसडे गाव टँकरमुक्त होण्याची आशा
खेड (प्रतिनिधी) : पावसाच्या अनियमिततेमुळे खेड तालुक्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाची एकही सर न पडल्याने शेती आणि पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर बनले आहे. भातशेतीला मोठा फटका बसला असून ओला चारा सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत पावसाची प्रतीक्षा न करता पंचायत समिती सदस्य संग्रामशेठ कदम यांच्या सहभागातून आणि ग्रामस्थांच्या सामूहिक श्रमदानातून चिंचघर-दस्तुरी येथे बंधारा उभारण्यात आला आहे. शासनाचा एकही रुपया न घेता उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यात लाखो लिटर पाणी अडवण्यात आले असून जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम तालुक्यासाठी आदर्श ठरणार आहे.
पावसावर अवलंबून असलेल्या खेड तालुक्यात यंदा पावसाने मोठी अनियमितता दाखवली. हादगा नक्षत्रात पाऊस पडेल आणि पाण्याची उपलब्धता वाढेल, अशी अपेक्षा शेतकरी व ग्रामस्थांना होती. मात्र, हे नक्षत्रही कोरडे गेल्याने भातपिकांचे नुकसान झाले, तर ओला चारा सुकू लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला. या परिस्थितीत पावसाची वाट पाहत बंधारा बांधण्यास विलंब केला असता, पाऊस आल्यास बंधारा वाहून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामस्थांनी उशिरा बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाऊसच न झाल्याने अखेर उपलब्ध परिस्थितीचा विचार करून चिंचघर-दस्तुरी येथील बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले.
पंचायत समिती सदस्य संग्रामशेठ कदम यांच्या सहभागातून या बंधाऱ्याच्या उभारणीत बावाशेठ चव्हाण, गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक आणि जेसीजचे सदस्य यांनी एकत्रितपणे श्रमदान केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात माती टाकून बंधारा उभारण्यात आला. विशेष म्हणजे, शासनाकडून कोणताही निधी न घेता लोकसहभागातून हा उपक्रम पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे जलसंधारणासोबतच सामाजिक एकजुटीचेही दर्शन या बंधाऱ्याच्या माध्यमातून घडले आहे.
चिंचघर-दस्तुरी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना दस्तुरी आणि देवसडे ही गावे आहेत. देवसडे गावातील सात वाड्या सध्या टँकरग्रस्त असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात पाणी उपलब्ध नसल्याने शेजारील सुशील गावातून डबल पंप लावून पाणी आणावे लागत आहे. या बंधाऱ्यात अडवण्यात आलेल्या पाण्यामुळे देवसडे गावातील पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे. यंदा देवसडे गाव पूर्णपणे टँकरमुक्त होईल, असा विश्वास शिवसेना उपनेते संजय कदम यांनी व्यक्त केला. गाव टँकरमुक्त झाल्यास पाणीपुरवठ्यासाठी शासनाला करावा लागणारा खर्चही वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या श्रमदानातून उभारण्यात आलेल्या आदर्श बंधाऱ्याचा जलपूजन सोहळा गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा महसूल राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून जलसंधारणाच्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.
पंचायत समिती सदस्य संग्रामशेठ कदम यांच्या सहभागातून आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेला हा बंधारा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या आदर्श बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील असंख्य नागरिक भेट देणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते संजय कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत चिंचघर-दस्तुरी येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.










