देवरूख (प्रतिनिधी) :
२ महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिट, रत्नागिरीद्वारे १० दिवसीय ‘कोकण ज्ञान तरंग’ या सागरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत महाराष्ट्रातील ६० एनसीसी छात्र सहभागी होऊन, शिडाच्या बोटीच्या सहाय्याने रत्नागिरी ते पालशेत आणि परतीचा सुमारे २५० किलोमीटर सागरी प्रवास त्यांनी पूर्ण केला. सागरी नौकावहनाचे कौशल्य, साहसी वृत्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रजासत्ताक दिन २०२७ च्या पार्श्वभूमीवर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील एकूण १२० कॅडेट्सनी पूर्वप्रशिक्षणात सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणादरम्यान छात्रांना सागरी नौकावहन ,रोईंग आणि दर्यावर्दी कौशल्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. समुद्रातील बदलत्या परिस्थितीचा सामना करताना आवश्यक असणारी शिस्त, समन्वय आणि निर्णय क्षमता विकसित करण्यावर यामध्ये भर देण्यात आला होता. १० दिवसाच्या खडतर पूर्व प्रशिक्षणातून ६० छात्रांची ‘व्हेलर सेलिंग एक्स्पेडिशन(मेन्यू-२७)’ करिता निवड करण्यात आली. निवड झालेल्या छात्रांनी २७ फूट लांबीच्या डिके प्रकारातील बोटिंच्या सहाय्याने सागरी प्रवास केला.’कोकण ज्ञान तरंग’ या मोहिमेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुखमधून कॅडेट कॅप्टन केतन रोशन कदम(तृतीय वर्ष, संगणक विज्ञान), कॅडेट यश संदीप कानार(तृतीय वर्ष, वाणिज्य), कॅडेट शुभम सुजित चव्हाण(द्वितीय वर्ष, वाणिज्य), कॅडेट ज्ञानल संजय धामणसकर(द्वितीय वर्ष, संगणक विज्ञान) आणि ए. एन. ओ. सब लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये यांचा सहभाग होता. ‘कोकण ज्ञान तरंग’ या सागरी मोहिमेच्या पूर्वी १० ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत आयोजित ‘प्री-मेनू कॅम्प:२७’मध्ये महाविद्यालयातून ९ कॅडेट्स सहभागी झाले होते. या सागरी मोहिमेमध्ये कॅडेट कॅप्टन केतन कदम यांचा सीनियर एस.डी. म्हणून समावेश असलेल्या बोट नंबर ११ला ‘बेस्ट व्हेलर टीम’चा पुरस्कार प्राप्त झाला, या बोटचे प्रशिक्षक पी. आई. स्टाफ अभिषेक अग्रहारी यांचे बहुमोल मार्गदर्शन टीमला लाभले. सागरी मोहीम समारोप कार्यक्रमासाठी एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूरचे डेप्युटी ग्रुप कमांडर कर्नल अनुप उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सहभागी नेव्हल कॅडेट्स, प्रशिक्षक आणि मुख्य सेलिंग टीमचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि शून्य अपघात(झिरो इन्सिडेंट) मोहिमेसाठी सत्कार करण्यात आला.
‘कोकण ज्ञान तरंग मोहिमे’चे ब्रीदवाक्य “ज्ञानाच्या लाटा, प्रगतीच्या वाटा” हे होते. सागरी प्रवासादरम्यान शिस्त, संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित करण्याबरोबर समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला गेला. या सागरी मोहिमेतून कॅडेट्सना सागरी जैवविविधता, खारफुटीचे पर्यावरणीय महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाची आवश्यकता यांची माहिती मिळाली. ‘कोकण ज्ञान तरंग’ या संकल्पने अंतर्गत या सेलिंग मोहीमेसोबत सामाजिक बांधिलकी उपक्रम राबवण्यात आले. मालगुंड, वरवडे, तवसाळ, वेळणेश्वर, गुहागर, जयगड या प्रमुख बंदरावर व किनारपट्टीवरील ठिकाणी कॅडेट्सनी पथनाट्याच्या माध्यमातून युवा सक्षमीकरण, मुलगी वाचवा-मुलगी शिकवा, समुद्र संरक्षण आणि संरक्षण क्षेत्रातील कारकीर्द मार्गदर्शन या विविध विषयांवर प्रभावी जनजागृती करून सुमारे २,८०० नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला. भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, नागरी प्रशासन, बंदर प्राधिकरण आणि स्थानिक शिक्षण संस्था यांच्यातील उत्तम समन्वयामुळे २५० किलोमीटरचा हा प्रवास शून्य सुरक्षा धोक्यांसह सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कोल्हापूर येथील एनसीसी ग्रुप मुख्यालय आणि महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या मार्गदर्शनाखाली २ महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या ‘मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट (मेन्यू २७)’ या खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेची यशस्वी सांगता झाली. सागरी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.












