१० मंडळांचा सहभाग!
लांजेवाडी मित्रमंडळाने पटकावला प्रथम क्रमांक
भालचंद्र कुंभारवाडी द्वितीय, पिंपळपार सुतारवाडी तृतीय
कणकवली : दिवाळीच्या निमित्ताने कलमठ बाजारपेठ येथे संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीकृष्ण व नरकासुर स्पर्धेला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कलमठ गाव मर्यादित आयोजित या स्पर्धेत गावातील तब्बल १० मंडळांनी सहभाग घेत आपापल्या कलाकृती सादर केल्या. श्रीकृष्ण व नरकासुराच्या आकर्षक प्रतिकृती पाहण्यासाठी कलमठ बाजारपेठेत नागरिकांसह प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती.
दिवाळी सणाचे औचित्य साधून संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे कलमठ बाजारपेठेत विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. गड-किल्ले स्पर्धा, अंगण रांगोळी स्पर्धा, डबलबारी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्थानिक कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही श्रीकृष्ण व नरकासुर स्पर्धेच्या निमित्ताने गावातील मंडळांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
स्पर्धेचा निकाल जाहीर होताच कलमठ लांजेवाडी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. भालचंद्र कुंभारवाडी मंडळाने द्वितीय, तर पिंपळपार सुतारवाडी मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. चौथा क्रमांक कलमठ इसवटी कोष्टीवाडी मंडळाने, तर पाचवा क्रमांक बिडीयेवाडी मंडळाने पटकावला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, अण्णा खाडये, सुनील नाडकर्णी, उपसरपंच पपू यादव, स्वप्नील चिंदरकर, संतोष पुजारे, दिनेश गोठणकर, अनुप वारंग, नितीन पवार, गिरीष धुमाळे, अनिल मेस्त्री, तनोज कळसुलकर, मंडळाचे अध्यक्ष तेजस लोकरे, समीर कवठणकर, आबा कोरगावकर, स्वरूप कोरगावकर, परेश कांबळी, प्रणय शिर्के, बाबू नारकर, सचिन पेडणेकर, संतोष रेवंडकर, दिनार लाड, प्रथमेश धुमाळे, सचिन वाघेश्री, विराज मेस्त्री, प्रविण सावंत, कृष्णा कांबळी आणि महेश मेस्त्री आदी उपस्थित होते.
यावेळी अण्णा खाडये यांनी संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, संदीप मेस्त्री मित्रमंडळाचे कार्य जिल्ह्यातील तरुण मंडळांसाठी प्रेरणादायी आहे. मित्रमंडळाच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम पाहून जिल्ह्यातील अनेक मंडळेही असे उपक्रम राबवितात. कलमठमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दर्जेदार स्पर्धेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. अशा उपक्रमशील कार्यामुळेच कलमठ गाव नेहमी संदीप मेस्त्री यांच्या पाठीशी ठामपणे उभे असते, असे त्यांनी सांगितले.
संदीप मेस्त्री यांनी आभार प्रदर्शन करताना या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. इतर मोठ्या शहरांमध्ये आयोजित होणारे विविध उपक्रम कलमठ गावातील नागरिकांनाही आपल्या गावात अनुभवता यावेत, या उद्देशाने मित्रमंडळाच्या माध्यमातून अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली २० वर्षे संदीप मेस्त्री मित्रमंडळ विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. यापुढेही गावातील सर्वांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, यावर्षी कलमठ महोत्सवाचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले.













