उमेश खताते यांच्या तीन ते चार वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे तत्काळ कार्यवाहीमुळे खेर्डीकरांचे स्वप्न होणार साकार
चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डी गावामध्ये तसेच खेर्डी एमआयडीसी परिसरात वारंवार आगीच्या दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता, येथे स्वतंत्र फायर स्टेशन उभारण्यात यावे, अशी मागणी युवासेना सरचिटणीस (रायगड-रत्नागिरी लोकसभा) उमेश खताते यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने लावून धरली होती. यासाठी त्यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करून संबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला होता. काही महिन्यांपूर्वी खेर्डी परिसरात आगीची दुर्घटना घडल्यानंतर फायर स्टेशनची आवश्यकता पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर गणपती उत्सवाच्या काळात उमेश खताते यांनी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खेर्डीमध्ये फायर स्टेशन उभारण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला आदेश देत खेर्डीमध्ये फायर स्टेशन मंजूर करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. अखेर फायर स्टेशनला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात फायर स्टेशनच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे खेर्डीतील व्यापारी वर्ग, एमआयडीसीमधील उद्योजक, कामगार तसेच खेर्डी आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. फायर स्टेशनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याबद्दल खेर्डीतील व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करून खेर्डीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये पुढाकार घेतल्याबद्दल श्री. उमेश खताते यांचेही सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. खेर्डीमध्ये फायर स्टेशन उभारले गेल्यानंतर केवळ खेर्डी गावालाच नव्हे, तर संपूर्ण खेर्डी एमआयडीसी, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार आणि आजूबाजूच्या गावांनाही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अग्निशमन सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. खेर्डीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आजचा दिवस निश्चितच महत्त्वाचा आणि समाधानाचा ठरणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, लोकहिताची मागणी आणि शासनाच्या सकारात्मक निर्णयातून विकासाचे एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. खेर्डीकरांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले.













