देवरूखात ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ; बागवाडी येथे भरदिवसा घरफोडी करून साडेतीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी केली लंपास

चोरट्यांची दिवाळी; पोलीसांसमोर चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

निलेश जाधव / देवरूख:

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख बागवाडी येथे ऐन दिवाळीत घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, देवरूख पोलीसांसमोर या घरफोडीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख बागवाडी परिसरात घडलेल्या या घरफोडीच्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत व रोकड अशी ३ लाख ५१ हजार ९०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. देवरूख बागवाडी येथे घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घरात मौल्यवान दागिने व रोकड ठेवणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. विशेषतः घर बंद ठेवून बाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी, संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, योगिता रविंद्र फेफडे (वय ४०, रा. श्रीराम नारायण कदम यांचे भाड्याचे घर, बागवाडी, ता. संगमेश्वर) यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी कठीण हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर हॉलमधील लोखंडी पत्र्याच्या कपाटातील लॉकर फोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजात ६० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ८० हजार रुपयांचा सोन्याचा हार, सोन्याची कानातली, चांदीचे पैंजण, बाळाच्या चांदीच्या बाळ्या, चांदीची जोडवी, वाटी, ब्रेसलेट, मंगळसूत्र यांसह १ लाख ७० हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. दरम्यान देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याचा शोध देवरूख पोलीस घेत आहेत.