चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान एका वराच्या रूममधून तब्बल १ लाख ८७ हजार ३४९ रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत फिर्यादी सौ. जागृती संदेश मोरे (वय ३२, रा. कोपरी, ठाणे) यांनी सावर्डे / चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांनी आपले सोन्याचे मंगळसूत्र आईकडे ठेवण्यासाठी दिले होते. त्यांच्या आईने ते मंगळसूत्र आपल्या हँडबॅगमध्ये ठेवून ती बँग साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आणली आणि शारदा मंगल कार्यालयातील वराच्या रूममध्ये ठेवली होती. दरम्यान, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने या बॅगमधील बॉक्समधील ४४.४८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व मंगळसूत्र पट्टीचे डिझाइन असलेले (दोन सोन्याच्या डवल्या असलेले) सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५(अ) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.











