सावर्डेतील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा छडा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मुंबईतून शोध, तरुण ताब्यात 

रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे (ता. चिपळूण) येथून दिनांक ०९ नोव्हेंबर २०२६ रोजी अपहरित झालेली १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या संबंधित युवकाचा रत्नागिरी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबईतून यशस्वी शोध घेतला आहे. या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १३७ (२) अन्वये लागलीच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी यांनी तात्काळ सावर्डे येथील घटनास्थळी भेट दिली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (खेड उपविभाग) श्री. शैलेश सणस, उपविभागीय पोलीस अधिकारी (लांजा उपविभाग) श्री. सुरेश कदम, सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. आबासो पाटील, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली विविध शोध पथके तयार करून अपहरित मुलीचा व संबंधित मुलाचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. सावर्डे परिसरात निर्माण झालेली चिंता व तणाव पाहता प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांनी तत्परतेने हस्तक्षेप करत घटनास्थळी Q.R.T. (क्विक रिस्पॉन्स टीम) पथके तैनात केली होती व विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली.
आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मुंबईतून अपहरित मुलगी व संबंधित युवकाचा शोध घेण्यात यश आले आहे. अपहरित मुलीला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले असून, संबंधित युवकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही यशस्वी कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे, चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे, पोलीस हवालदार दीपराज पाटील, गणेश सावंत आणि सहायक पोलीस फौजदार पांडुरंग गोटे यांच्या पथकाने पार पाडली आहे.