जामसंडे-शिळोम येथे बंद घर फोडले; घरातील नळ चोरट्यांनी पळविले

जामसंडे-शिळोम येथे बंद घर फोडले; घरातील नळ चोरट्यांनी पळविले

जामसंडे-शिळोम येथील रहिवासी प्रसाद गोपाळ मोंडकर यांचे बंद घर चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील सर्व नळ कापून चोरून नेण्यात आले असून अन्य कोणती मालमत्ता चोरीला गेली आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मोंडकर कुटुंबीय सध्या पुणे येथे असल्याने चोरीच्या नुकसानीचा नेमका तपशील समोर आलेला नाही.

घरातील लोखंडी सिक्युरिटी डोअर आणि मुख्य दरवाजा आतून बंद होते. मात्र, दोन्ही दरवाजांची कुलपे काढून ठेवण्यात आली होती. घराकडे नेहमी येणाऱ्या कामगाराच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने मोंडकर कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित कामगार आणि शेजाऱ्यांनी घराची पाहणी केली असता, घराच्या मागील बाजूचा कुलूप लावण्याचा भाग कापल्याचे दिसून आले. मागील दरवाजे उघडे असून केवळ ओढून लावण्यात आले होते.

शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, संपूर्ण घरातील नळ कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. मात्र, घरातील अन्य वस्तू किंवा मालमत्तेची चोरी झाली आहे का, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रसाद मोंडकर गावी परतल्यानंतर चोरीचा नेमका तपशील आणि झालेल्या नुकसानीची माहिती स्पष्ट होणार आहे.