गोड्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न सुरू
काँग्रेस नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी कौन्सिल बैठकीत वेधले होते लक्ष
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील गोवळकोट-पेठमाप परिसरात नागरिकांना खाऱ्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून, या प्रश्नामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात खारे पाणी येत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन वापरासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या समस्येकडे काँग्रेसचे नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रश्नाची दखल घेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमसह गोवळकोट-पेठमाप परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान खाऱ्या पाण्याच्या समस्येची कारणे जाणून घेण्याबरोबरच नागरिकांना गोडे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. परिसरातील नागरिकांना स्वच्छ व गोडे पाणी मिळणे ही मूलभूत गरज असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले. प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थिती समजून घेतल्याने आता या प्रश्नावर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या या प्रश्नानंतर नगराध्यक्षांनी स्वतः परिसरात जाऊन पाहणी केल्याने गोवळकोट-पेठमापमधील नागरिकांचे लक्ष आता पालिकेच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.













