चिपळूण (प्रतिनिधी) : येथील साहित्यिक-पत्रकार आणि कोकण ‘पर्यावरण-पर्यटन’ क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर यांना विश्वकर्मा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या ‘जनी जनार्दन’ या चरित्र ग्रंथासाठी पुण्याच्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे प्रतिष्ठेचे पारितोषिक जाहीर झाले आहे. भारताचे प्रबोधन पुरुष न्या. महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा. गो. भांडारकर यांनी स्थापन केलेली ही संस्था असून संस्थेच्या १३२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पुणे येथे २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी फाऊंडेशनच्या सभागृहात पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षीचे ग्रंथपुरस्कार कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे आणि संस्थेचे माजी अध्यक्ष व डेक्कन कॉलेज विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रा. डॉ. अलीम वकील, राजीव साने, डॉ. भारत सातपुतें आदींना ग्रंथपुरस्कार देण्यात येणार असून ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसेवक प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे यांना डॉ. आनंद केळकर स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
मराठी साहित्य क्षेत्रात अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या या संस्थेच्या पारितोषिकांकडे आदराने पाहिले जाते. ही संस्था संशोधनपर आणि वैचारिक ग्रंथांना गौरवित असते. ‘जनी जनार्दन’ हे भारत सरकारच्या ‘हाफकिन’ संस्थेने शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे ‘प्रवर्तक’ आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांच्या एका आगळ्यावेगळ्या क्षेत्राला जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तीचे मराठी साहित्यात अपवादाने पाहायला मिळणारे ७०८ पृष्ठांचे प्रेरणादायी महाचरित्र आहे. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी) गेली १३० वर्षे मराठीतील उत्कृष्ट ग्रंथांना पारितोषिक देऊन प्रोत्साहित करण्याचे कार्य करीत आहे. ही संस्था महाराष्ट्रातील सर्वांत जुनी साहित्य संस्था आहे. आधुनिक महाराष्ट्राचे आद्द्य प्रवर्तक न्या. महादेव गोविंद रानडे, जागतिक कीर्तीचे संस्कृत पंडित डॉ. सर रामकृष्ण भांडारकर, प्रसिद्ध कादंबरीकार हरि नारायण आपटे, भारतीय अशांततेचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इत्यादी पंचवीस द्रष्ट्या महाराष्ट्रीय समाजधुरीणांनी मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्युदयासाठी ही संस्था १८९४ मध्ये स्थापन केली होती. राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत या संस्थेचे योगदान अनन्यसाधारण आहे.
वाटेकर हे चिपळूणातील १६२ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे संचालक आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ या विषयावरील परिसंवादात निमंत्रित वक्ते म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन ही ५ पर्यटनविषयक आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थीनी आणि जनी जनार्दन ही ४ चरित्र आदी ९ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि ‘वाशिष्टीच्या तीरावरून’ या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थ’ (कोकण इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर), आयुष्य जगलेला गुरुजी आदी पुस्तकांसह विविध विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक अशा सुमारे ३५हून अधिक संग्राह्य अंक आणि पुस्तिकांचे संपादन त्यांनी केले आहे. त्यात कोकणातून गेली दीडशे वर्षे सातत्याने प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक सत्यशोधकचा सुमारे ४६० पानांचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी विशेषांक आणि कोयना जलविद्युत प्रकल्पासह अलोरे (चिपळूण) गाव वसाहतीच्या गत पन्नास वर्षांच्या दुर्मीळ इतिहासाचा मागोवा असलेल्या शाळेच्या ४५०पानी संग्राह्य स्मरणिकेचा समावेश आहे.













