बॅरिस्टर नाथ पै सभागृहात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ तालुकास्तरीय कार्यशाळा
सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे प्रशासन उत्तम कामगिरी करत असून, राज्यभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याची दखल घेतली जात आहे. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातही आपला जिल्हा अग्रेसर राहील. या अभियानात सावंतवाडी तालुक्याने प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी मेहनत घेतली असून आमचेही पूर्ण सहकार्य त्यांना राहील व मला खात्री आहे की या अभियानात सावंतवाडी तालुका निश्चितच अव्वल राहील , असा ठाम विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ तालुकास्तरीय कार्यशाळेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना बीज भेट देत वृक्षारोपणाचे आवाहन करण्यात आले, तसेच तालुक्यात माकडताप आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने जनजागृती मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५४ ग्रामपंचायतींचा सहभाग घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विभागीय व जिल्हास्तरावर ग्रामपंचायत तसेच उत्कृष्ट उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न ग्राम’ म्हणून घोषित केले जाणार आहे.
जिल्हास्तरीय मुल्यांकनात प्रथम तीन ग्रामपंचायतींना ‘आरोग्य प्रेरणा ग्राम’, विभाग स्तरावर ‘आरोग्य गौरव ग्राम’ तर राज्यस्तरावर ‘आरोग्य भूषण ग्राम’ पुरस्कार प्रदान केले जाणार असून, विविध पुरस्कारांच्या माध्यमातून ६५.२५ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन आजच्या कार्यशाळेत करण्यात आले.
आपल्या मनोगतात श्री. कामत पुढे म्हणाले की, आरोग्याच्या या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांनी तळागाळापर्यंत पोहोचत यात लोकसहभाग वाढवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मिळून आणखी प्रयत्न करावेत. ‘माझं गाव नंबर एकवर असलं पाहिजे’ या जिद्दीने सर्वांनी काम करावे, असे आवाहन करत दुसरीकडे डेंग्यू आणि माकडताप यांसारखी संकटेही आपल्यासमोर आहेत, त्यावर मात करून आपल्याला नंबर एक प्राप्त करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मॉडेल संपूर्णराज्यात चर्चिले जाते. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जसे एक नंबर आहोत, तसेच आरोग्यातही राहू, असा विश्वास व्यक्त करत ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सावंतवाडी तालुका नंबर एकवर यावा यासाठी तालुक्याने मेहनत घेतली असून आमचेही सहकार्य यापुढेही राहील, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
दरम्यान, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ यात आपला जिल्हा निश्चितच स्पर्धेत यशस्वी होईल. आरोग्य विभागाने चांगल्या प्रकारचे काम केले असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, आशा सेविकांसह अधिकारी व कर्मचारी वर्गाचा यात सक्रिय सहभाग आहे. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी जवळपास दीडशेच्या आसपास ग्रामपंचायतींनी ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण आजमितीस प्राप्त केले आहेत. वेंगुर्ला आणि सावंतवाडीत कार्यशाळा पार पडली असून, येणाऱ्या काळात जिल्ह्याची देखील कार्यशाळा घेऊन या अभियानात अव्वल स्थान मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. तसेच माकडतापसारख्या आजारावर मात करण्यासाठी जनजागृती देखील मोहीम स्तरावर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश कर्तसरकर आदींनीही मनोगत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, मायकल डिसोझा, स्नेहा टिळवे, प्रियांका देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तसरकर, जिल्हा पर्यवेक्षक शंकर परब यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












