मंडणगडमध्ये रंगणार ‘ओम साई प्रीमियर लीग’ अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा थरार ; खेळाडू नोंदणीला सुरुवात!

१०० खेळाडूंनाच संधी, नोंदणीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील क्रिकेटप्रेमी खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ओम साई गोविंदा पथक मंडणगड यांच्या वतीने ‘ओम साई प्रीमियर लीग’ (सीझन १) या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव करून संघांची निर्मिती केली जाणार असल्याने या स्पर्धेबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खेळाडूंना नोंदणी अर्जामध्ये आपले संपूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक, पत्ता, खेळाचा प्रकार तसेच टी-शर्टचा आकार अशी माहिती भरावी लागणार आहे. खेळाडूंनी पासपोर्ट आकाराचा फोटो जोडणे आवश्यक आहे. फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू अशा प्रकारांमध्ये खेळाडूंना आपली नोंदणी करता येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी काही महत्त्वपूर्ण नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून सर्व खेळाडूंना टी-शर्ट घालणे अनिवार्य असेल. गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंवर दंडात्मक कारवाई म्हणून एका सामन्याची बंदी घालण्यात येणार आहे. स्पर्धेतील संघांची निवड आयपीएलप्रमाणे लिलाव पद्धतीने केली जाणार असून लिलावातून मिळालेल्या संघासाठी खेळण्याची तयारी खेळाडूंनी ठेवणे आवश्यक आहे. संघमालक व कर्णधार यांच्याशी खेळाडूंनी सन्मानाने वागणे अपेक्षित असून त्यांच्या नियोजनानुसार संघाचे कामकाज चालणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क शंभर रुपये निश्चित करण्यात आले असून शुल्क जमा केल्यानंतरच खेळाडूचा प्रवेश निश्चित केला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडू मंडणगड तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेसाठी केवळ १०० नोंदणी अर्ज उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. यामध्ये मागील स्पर्धेतील खेळाडूंना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी विलंब न करता आपली नोंदणी पूर्ण करावी. नोंदणी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. संपर्क व अधिक माहीतीसाठी रमाकांत साळुंखे, सागर सापटे, यश जांभळे, आयुष सापटे, राहुल पारेख यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच तालुक्यातील नवोदित व होतकरू क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या ओम साई प्रीमियर लीगमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होऊन क्रिकेटचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक ओम साई गोविंदा पथक मंडणगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.