ज्ञानदीप भडगावच्या चार विद्यार्थ्यांची सीए फाउंडेशन परीक्षेत यशस्वी कामगिरी

इयत्ता ११ वीपासून सुरू केलेल्या मार्गदर्शन व सराव परीक्षांचा फायदा; विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन

खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचलित श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव येथील उच्च माध्यमिक विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०२६ मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन (C.A. Foundation) परीक्षेत यश संपादन केले आहे. बारावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेल्या सुशांत सुरेश काणीम, गौरी संजय सावंत, आर्यन संतोष बिजीतकर आणि रिया प्रकाश विचारे यांनी या परीक्षेत यश मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक यशात भर घातली आहे.
विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीपासूनच सीए फाउंडेशन परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याची विशेष उपक्रमशील पद्धत विद्यालयात सुरू करण्यात आली होती. नियमित मार्गदर्शन, अभ्यासाचे नियोजन आणि सराव परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी करून घेण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, चारही विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक डॉ. चंद्रसेन घुंबरे यांच्यासह संजय पाटील, मारुती आडाव, विठ्ठल सकुंडे, अतुल आगलावे आणि कांतिनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने हे यश शक्य झाले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे शैक्षणिक प्रगती साधत सीए क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवावे, यासाठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.