रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे निकटवर्तीय वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांचे आज (१९ नोव्हेंबर) सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.
रत्नागिरीच्या राजकीय, सामाजिक, सहकार आणि पत्रकारिता क्षेत्रात राजाभाऊ लिमये यांचा मोठा दबदबा होता. अभ्यासू आणि स्पष्टवक्ते नेतृत्व म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जिल्हा परिषद अध्यक्षपदासह जिल्हा बँकेचे संचालक, नारळ विकास मंडळाचे (बोर्डाचे) अध्यक्ष आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष अशी विविध महत्त्वाची पदे भूषवून कोकणच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीतील टिळक आळी येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.













