पाणी बचत आणि जलसंवर्धनाचा संदेश सोशल मीडिया रील्स व व्हिडिओंच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणार; स्थानिक कलाकारांचा मोहिमेत सहभाग
खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रावर आगामी काळात दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी बचत आणि जलसंवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी खेड नगर परिषद आणि खेड क्रिएटर स्क्वॉड यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. ‘जल है तो कल है’ या प्रभावी संदेशाच्या माध्यमातून सोशल मीडिया रील्स, व्हिडिओ आणि विविध जनजागृतीपर उपक्रम राबवून पाण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
पाण्याचा अपव्यय रोखणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच जलसंवर्धनाच्या उपाययोजना अंगीकारणे आवश्यक आहे. याच सामाजिक जाणीवेतून खेड नगर परिषद आणि खेड क्रिएटर स्क्वॉड एकत्र आले असून, मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या मोहिमेच्या नियोजनाच्या अनुषंगाने खेड शहरातील नामांकित रीलस्टार आणि कलाकारांनी खेड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष माधवी ताई बुटाला यांची भेट घेतली. यावेळी नगराध्यक्ष माधवी ताई बुटाला, मुख्याधिकारी माधव रोडगे, उपनगराध्यक्ष पप्पू चिकणे आणि शिवसेना गटनेते निकेतन पाटणे यांच्या उपस्थितीत जलसंवर्धन जनजागृती मोहिमेच्या स्वरूपाबाबत आणि नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मोहिमेत खेड क्रिएटर स्क्वॉडचे शीतल श्रीरामे, सागर कदम, शुभम केसकर, मॅक्स मोहिते, जितू गोरे, अरबीना नाडकर, ओंकार किरडावकर, ऋतिक रेवाळे आणि भूमी दळवी हे कलाकार सहभागी होणार आहेत. सोशल मीडियाची वाढती लोकप्रियता आणि तरुणाईचा मोठा सहभाग लक्षात घेऊन या कलाकारांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पाणी बचतीचे महत्त्व, पावसाच्या पाण्याचे संकलन, घरगुती पातळीवर पाण्याचा योग्य वापर, पाण्याचा अपव्यय टाळणे तसेच जलस्रोतांचे संवर्धन यासारख्या विषयांवर विशेष रील्स आणि जनजागृतीपर व्हिडिओ तयार करण्यात येणार आहेत. मनोरंजनात्मक आणि सहज समजणाऱ्या पद्धतीने हे संदेश मांडल्यामुळे नागरिक, विशेषतः तरुण वर्ग, या मोहिमेशी जोडला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
खेड नगर परिषद आणि स्थानिक कलाकारांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम केवळ खेड शहरापुरती मर्यादित न ठेवता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा मानस आहे. पाणी ही केवळ आजची गरज नसून भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची सवय अंगीकारून जलसंवर्धनाच्या कामात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
‘पाणी वाचवा, भविष्य घडवा… जल है तो कल है!’ या संदेशासह खेड शहरात जलसंवर्धनाबाबत जनजागृतीची नवी मोहीम सुरू होणार असून, प्रशासन आणि स्थानिक सोशल मीडिया कलाकारांच्या एकत्रित प्रयत्नातून पाणी बचतीचा संदेश जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.













