सीसीटीव्ही फुटेजमधील निळ्या टी-शर्टवरून संशयिताला ओळखले; पंचायत समितीच्या कँटीनपासून एटीएमपर्यंत थरारक पाठलाग करून तरुणांनी पकडले
मंडणगड (प्रतिनिधी) : सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या निळ्या रंगाच्या टी-शर्टवरून संशयित चोराची ओळख पटविण्याची समयसूचकता मंडणगड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या सर्वेश सापटे या जागरूक तरुणाने दाखवली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्गवाडी येथील ज्येष्ठ महिलेची सोन्याची बोरमाळ चोरणाऱ्या संशयिताला पकडण्यात तरुणांना यश आले. पंचायत समितीच्या कँटीनपासून सलून, एटीएम आणि उंच गवतापर्यंत रंगलेल्या या पाठलागाचा थरार बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) मंडणगड शहरात अनुभवायला मिळाला. अखेर तरुणांनी संशयिताला पकडून मंडणगड पोलिसांच्या ताब्यात दिले.
दुर्गवाडी येथील एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून तिच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ लंपास करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते. या फुटेजमध्ये संशयित व्यक्तीच्या अंगावर निळ्या रंगाचा टी-शर्ट असल्याचे सर्वेश सापटे यांच्या लक्षात होते.
दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास पंचायत समिती परिसरातील कँटीनमध्ये एक व्यक्ती चहा पिण्यासाठी आली असता सर्वेश सापटे यांचे तिच्याकडे लक्ष गेले. संबंधित व्यक्तीच्या अंगावरील निळ्या रंगाचा टी-शर्ट सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताच्या टी-शर्टशी मिळताजुळता असल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीचा मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित करून मित्राला पाठवला. खात्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर दुर्गवाडी येथील भरत पोस्टुरे, राहुल खांबे, अनिकेत सापटे, रोहन दुर्गवले, पियुष सापटे, प्रसाद जाधव, सागर कदम यांच्यासह अन्य तरुणांनी पंचायत समिती परिसरात धाव घेतली. संशयिताला कोणताही संशय येऊ न देता त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली.
दरम्यान, संशयित जवळच असलेल्या सलूनमध्ये दाढी करण्यासाठी बसल्याचे तरुणांच्या निदर्शनास आले. दाढी करून बाहेर पडल्यानंतर त्याने बँक ऑफ इंडिया शाखेजवळील एटीएम परिसर गाठला. याचवेळी आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याची चाहूल त्याला लागली. त्याने बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये जाऊन बाहेर नजर टाकत आपला पाठलाग होत असल्याची खात्री केली.
त्यानंतर अचानक त्याने तेथून पळ काढला. बांधाच्या भिंतीवरून उड्या मारत उंच गवतात लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर उंच गवतात लपून बसलेल्या संशयिताला शोधून काढत तरुणांनी त्याला पकडले आणि मंडणगड पोलिसांच्या ताब्यात दिले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख सुरेश सुरक्या गवसकर (वय ४७, रा. नागाव, ता. माणगाव, जि. रायगड) अशी निष्पन्न झाली आहे.
या संपूर्ण घटनेत सर्वेश सापटे यांनी दाखवलेले प्रसंगावधान तसेच भरत पोस्टुरे, राहुल खांबे, अनिकेत सापटे, रोहन दुर्गवले, पियुष सापटे, प्रसाद जाधव, सागर कदम यांच्यासह अन्य तरुणांनी केलेला पाठलाग आणि दाखवलेली सतर्कता कौतुकाचा विषय ठरली आहे. या जागरूक तरुणांचे मंडणगड पंचायत समितीचे उपसभापती दीपक मालुसरे यांच्या हस्ते कौतुक करून सन्मान करण्यात आला. यावेळी रघुनाथ पोस्टुरे, सिद्धेश देशपांडे, वसीम चिपोलकर, सुभाष भागडे, संतोष धाडवे, उदय गोसावी आदी उपस्थित होते.












