लवेलजवळ पंक्चर डंपर भर महामार्गावर उभा; सुरक्षेचा अभाव, गौण खनिज वाहतुकीचे नियम धाब्यावर
खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरचा बेधडक कारभार सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी दुपारी लवेल गावाजवळ पाहायला मिळाले. एका डंपरचा टायर पंक्चर झाल्याने तो भर महामार्गावर उभा होता. मात्र, या नादुरुस्त डंपरच्या पुढे किंवा मागे वाहनचालकांना सावध करण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था अथवा इशारा चिन्ह लावण्यात आले नसल्याचे दिसून आले. महामार्गाचे काम पूर्ण झालेल्या या मार्गावर वाहनांची वेगाने ये-जा सुरू असताना अशा प्रकारे डंपर उभा असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
मुंबई-गोवा महामार्गावरून गौण खनिजाची वाहतूक करताना संबंधित माल पूर्णपणे झाकून आणि बंदिस्त करून नेण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसा उजेडात महामार्गावरून वाळू वाहतूक सुरू असताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या व्यावसायिकांवर कारवाईचा धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेजारील चिपळूण तालुक्यातून खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत असल्याची चर्चा आहे. गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक नियमांचे पालन होत आहे का, वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरला जात आहे का, तसेच वाहतूक करताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत का, याची तपासणी संबंधित यंत्रणांकडून होणे अपेक्षित आहे. मात्र, महामार्गावर दिसणाऱ्या प्रकारांमुळे आरटीओ आणि महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या वाळू व्यावसायिकांकडून आरटीओ अधिकाऱ्यांना ‘सरपंच’ असे नामकरण केल्याची चर्चा खेड तालुका परिसरात रंगली असून, या कथित ‘सरपंचांच्या’ अभयाखालीच वाळू वाहतूक सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. या चर्चेत नेमके किती तथ्य आहे, याची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी नियमबाह्य वाहतुकीच्या प्रकारांमुळे अशा चर्चांना उधाण आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्गावर वाहनांचा वेग अधिक असताना नादुरुस्त डंपर कोणतीही पूर्वसूचना किंवा सुरक्षा व्यवस्था न करता भररस्त्यात उभा ठेवणे म्हणजे इतर वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण करणे होय. अशा प्रकारांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणावर निश्चित होणार, हा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर नियमांची पायमल्ली होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे? नियमबाह्य वाळू वाहतुकीवर आरटीओ आणि महसूल विभाग कारवाई करणार का? वाळू व्यावसायिकांना कथित ‘सरपंचांचे’ अभय आहे का? की या वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? असे अनेक सवाल उपस्थित होत असून, संबंधित प्रशासनाने महामार्गावरील गौण खनिज वाहतुकीची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.













