मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांची मागणी
गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद असलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन तातडीने सुरू करणे व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद रत्नागिरी यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात मनसेचे विनोद जानवळकर यांनी पुढे म्हटले आहे की,गुहागर तालुक्यातील तळवली प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, या आरोग्य केंद्रातील काही महत्त्वाच्या आरोग्य सुविधा बंद अवस्थेत असून अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन सध्या बंद अवस्थेत आहे. या मशीनच्या माध्यमातून रक्तदाब, रक्तातील साखर, ऑक्सिजनचे प्रमाण, हृदयाचे ठोके, बीएमआय तसेच इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या करता येतात. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही अत्यंत उपयुक्त सुविधा असताना मशीन बंद असल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सदर मशीनची तातडीने दुरुस्ती करून ते नियमितपणे कार्यान्वित करण्यात यावे.तसेच तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी पदांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेविका, आरोग्य सेवक ,लॅब टेक्निशियन
शिपाई, सीएचओ , फार्मासिस्ट
वरील रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर होत आहे. नागरिकांना वेळेवर आणि योग्य आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे या समस्येकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच १) तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद असलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावे.२). प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.३) रिक्त पदे भरेपर्यंत पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून देऊन रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यात यावी.४).आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय उपकरणे व तपासणी सुविधा नियमितपणे कार्यरत आहेत की नाहीत, याची तपासणी करण्यात यावी.५)वरील सर्व मागण्यांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती आम्हाला देण्यात यावी.
अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आक्रमक पावित्रा घेण्यात येईल, याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी असेही शेवटी म्हटले आहे
या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, ही विनंती
उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर व्यक्त यांनी केली आहे.












