महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोकण सुपूत वरद अमित फासे याचे सुवर्णयश

१० मीटर एअर रायफल ज्युनिअर गटात पटकावले सुवर्णपदक

दापोली प्रतिनिधी :

महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वतीने गोवा येथील मांड्रेम (यश शूटिंग हब) येथे आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत (MSSC २०२६) युवा नेमबाज वरद फासे याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत वरद फासे याने आपल्या संयमी आणि अचूक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी नेमबाजांना मागे टाकले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. रायगड जिल्ह्यातील वरद फासे यांनी गोवा राज्यात कोकणाचे नाव उंचावले आहे.

मुलांच्या १० मीटर एअर रायफल ज्युनिअर गटाच्या अंतिम फेरीत वरदने अचूक वेध घेत अव्वल स्थान पटकावले. बालेवाडी (पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने यंदाची राज्यस्तरीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा १३ ते १९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान प्रथमच महाराष्ट्राबाहेर गोवा येथे खेळवण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो नामवंत नेमबाजांनी सहभाग नोंदवला होता.

 

वरद फासे हा रायगड जिल्ह्यातील (पनवेल/खांदा कॉलनी) एक उदयोन्मुख आणि गुणवान नेमबाज असून, त्याने यापूर्वीही शालेय राष्ट्रीय व विभागीय नेमबाजी स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील त्याच्या या सुवर्णमय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून आणि सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन होत असून, राष्ट्रीय स्तरावरही तो अशीच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.