इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी नितीश कुमार रेड्डीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह; पुनरागमनासाठी सुरू वेळेशी शर्यत
इजा अद्याप पूर्णपणे बरी नाही; पुनर्वसनालाही सुरुवात झालेली नाही
इंग्लंड मालिकेसाठी संघाची तयारी सुरू; काही खेळाडू लवकर दाखल होणार
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याच्या फिटनेसबाबत अद्यापही साशंकता कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तो वेळेत तंदुरुस्त होईल की नाही, यावर सध्या लक्ष केंद्रित झाले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला आणखी विश्रांतीचा सल्ला दिला असून त्याचे पुनर्वसनही अद्याप सुरू झालेले नाही. संघ व्यवस्थापन त्याच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ टप्प्याटप्प्याने एकत्र येण्यास सुरुवात करणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी हा 14 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी वेळेशी शर्यत करत आहे. प्रहार डिजिटलला मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला आणखी काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून त्याचे पुनर्वसन अद्याप सुरू झालेले नाही.
डाव्या क्वॅड्रिसेपमध्ये झालेल्या अस्वस्थतेमुळे त्याला अलीकडेच आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले जात असले, तरी चेन्नईतील अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेपासून तो मैदानापासून दूर आहे.
संघ व्यवस्थापन त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, पुढील महिन्यात तो संघात पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, इंग्लंड दौऱ्यात त्याचा सहभाग होण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धची टी-20 मालिका त्याच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधील पुनरागमनासाठी अधिक योग्य पर्याय ठरू शकते. याबाबतचा अंतिम निर्णय निवड समिती लवकरच घेणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू टप्प्याटप्प्याने एकत्र येणार आहेत. कर्णधार शुभमन गिल आणि यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुल यांच्यासह काही खेळाडू तयारीसाठी लवकर इंग्लंडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. उर्वरित खेळाडू 12 जुलैपर्यंत संघात सहभागी होतील.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह.
भारताचा इंग्लंड दौरा 2026 (वनडे मालिका) :
14 जुलै – पहिली वनडे, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
16 जुलै – दुसरी वनडे, सोफिया गार्डन्स, कार्डिफ
19 जुलै – तिसरी वनडे, लॉर्ड्स, लंडन












