हातावर वार झेलल्याने मच्छी विक्रेत्याचा जीव थोडक्यात बचावला; भर बाजारपेठेत घडलेल्या घटनेने देवरूखमध्ये उडाली खळबळ
देवरूख (प्रतिनिधी):
देवरूख शहरातील काल रविवारी भरलेल्या आठवडा बाजारात एका मच्छी विक्रेत्यावर तरुणाने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मच्छी विक्रेत्याने प्रसंगावधान राखत हातावर वार झेलल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. भर बाजारपेठेत घडलेल्या या प्रकारामुळे मात्र व्यापारी, विक्रेते तसेच बाजारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाने मच्छी विक्रेत्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विक्रेत्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केल्याने चाकूचा वार हातावर बसला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि विक्रेत्याचा जीव वाचला. मात्र, भर बाजारात अशा प्रकारे चाकूने हल्ला करण्याची घटना घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, संबंधित तरुण आणि मच्छी विक्रेत्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला होता, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती समजताच बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.
दरम्यान, देवरूखसारख्या शांत शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजारात चाकूने हल्ला करण्यापर्यंत मजल जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे. आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणावर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले खरेदीसाठी येत असतात. अशा ठिकाणी घडलेल्या या चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आठवडा बाजारातील वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांनी बाजाराच्या दिवशी अधिक बंदोबस्त ठेवावा, तसेच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त वाढवावी, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.













