केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीपाद नाईक यांची भेडशी प्रशालेस सदिच्छा भेट

 

दोडामार्ग (प्रतिनिधी) :

केंद्रीय राज्यमंत्री(ऊर्जा आणि नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालय) ना. श्रीपादजी नाईक यांनी नुकतीच ‘धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई’ संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, भेडशी या प्रशालेस सदिच्छा भेट दिली.

प्रशालेत आगमन होताच विद्यालयाच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य एन. एन. नाईक यांनी ना. श्रीपादजी नाईक यांना शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.

सत्कारानंतर ना. नाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध क्षेत्रांत प्रगती करून आपले आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य एन. एन. नाईक यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.