आंबोली : सह्याद्रीतील जैवविविधतेचा मुख्य हॉट स्पॉट असलेल्या आंबोलीत अत्यंत दुर्मिळ आणि स्थलांतरित पाहुणा ‘युरेशियन स्कॉप्स घुबड’ (Eurasian Scops Owl – Otus scops) याची प्रथमच अधिकृत नोंद झाली आहे. ही दुर्मिळ कामगिरी निसर्ग अभ्यासक कौस्तुभ कोरगांवकर, केदार जाधव व पार्थ भिसे यांनी केलेली आहे. तर युरेशियन स्कॉप्स घुबड हे आंबोलीत आढळून आल्याने निसर्ग व वन्यजीवप्रेमीं मधे आनंदाचे वातावरण आहे.
‘युरेशियन स्कॉप्स घुबड’ हे प्रामुख्याने युरोप आणि मध्य आशियातून आफ्रिकेकडे स्थलांतर करते, परंतु स्थलांतराच्या काळात चुकून किंवा मार्ग बदलल्यामुळे सह्याद्रीत अत्यंत दुर्मिळ दर्शन होते. पण ते क्वचितच. युरेशियन स्कॉप्स घुबड’ हे घुबड आकाराने खूप लहान असते. याचा रंग राखाडी-तपकिरी असून अंगावर झाडाच्या सालीसारख्या सूक्ष्म रेषा असतात, ज्यामुळे ते फांदीवर बसल्यावर सहज ओळखू येत नाही. डोळे चमकदार पिवळ्या रंगाचे असतात आणि डोक्यावर पिसांचे छोटे तुऱ्ये असतात. तसेच हे निशाचर घुबड असून रात्रीच्या वेळी एखाद्या शिट्टीसारखा किंवा बेडकासारखा एकसुरी आवाज (‘क्यूटी’ किंवा ‘प्यू’) काढते. मुख्यतः कीटक, नाकतोडे, छोटे सरडे आणि छोटे उंदीर हे याचे खाद्य आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी निसर्ग अभ्यासक कौस्तुभ कोरगांवकर, केदार जाधव व पार्थ भिसे हे तिघेही नेहमी प्रमाणे आंबोलीच्या जंगलात भ्रमंती करतेवेळी त्यांना अचानक ‘युरेशियन स्कॉप्स घुबडाचे अत्यंत दुर्मिळ दर्शन झाले. लागताच त्यांनी त्याला कॅमेराबद्ध केलं. त्यांनतर ‘युरेशियन स्कॉप्स घुबड’ बाबत खात्रीशीर माहिती संकलन करत सिंधुदुर्गात प्रथमच आंबोलीतून त्याची अधिकृत तथा दुर्मिळ नोंद केली. त्यामुळे कौस्तुभ, केदार व पार्थ यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
जैवविविधतेने संपन्न आंबोलीच्या जंगलात नेहमीच दुर्मिळ व अतिदुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास आढळून येतो. तर याआधी ही आंबोलीत स्थलांतरित ओरिएंटल स्कॉप्स घुबड, पॅलिड स्कॉप्स घुबड, शॉर्ट-इअर्ड घुबड आदी आढळून आले असून आता युरेशियन स्कॉप्स घुबडा ची नव्याने भर पडलेली आहे. तर एका अनुमानुसार १०/१२ प्रजातींची घुबडे आढळतात. तसेच युरेशियन स्कॉप्स घुबडाचीअधिकृत नोंद झाल्याने पक्षीप्रेमी पर्यटक व अभ्यासकांत आंबोली बाबत नव्याने उत्सुकता वाढली आहे.













