परशुराम घाटात भीषण अपघात! ब्रेक फेल कंटेनरने दुचाकीला चिरडले; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. ब्रेक फेल झाल्याने केमिकलचे ड्रम वाहून नेणारा कंटेनर महामार्गावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेला आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की कंटेनर आणि दुचाकी दोन्ही रस्त्याशेजारील खड्ड्यात कोसळले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने केमिकलचे ड्रम घेऊन जाणारा कंटेनर बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास परशुराम घाटातील धामणदेवी परिसरात आला असता त्याचे ब्रेक फेल झाले. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनर महामार्गावरील दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेला. त्याचवेळी लोटे औद्योगिक वसाहतीत कामावर जाणाऱ्या दुचाकीस्वाराला कंटेनरने जोरदार धडक दिली.
या धडकेनंतर कंटेनर आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत दुचाकीस्वार लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, मृत व्यक्तीची ओळख आणि इतर तपशील अधिकृतरीत्या स्पष्ट होणे बाकी आहे.
अपघाताची माहिती मिळताच जय हिंद ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसचे नवनाथ घोलप यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. केमिकलचे ड्रम वाहून नेणारा कंटेनर महामार्गाच्या विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला धडकण्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ब्रेक फेल झाल्यामुळे एका निष्पाप दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागल्याने महामार्गावरील अवजड वाहनांच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा आणि पुढील तपासाचा तपशील समोर येणे बाकी आहे.