ज्ञानदीप महाविद्यालयात बजाज फिनसर्वच्या रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ

बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील करिअरच्या संधींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; CPBFI अभ्यासक्रमातून व्यावहारिक ज्ञान मिळणार

खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य, मोरवंडे-बोरज येथे बजाज फिनसर्व यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या CPBFI या विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, या उद्देशाने या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन राजेश गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लक्ष्मीकांत कट्टी उपस्थित होते. त्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल यांनी केले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मीकांत कट्टी यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, व्यावसायिक दृष्टिकोन, रोजगाराच्या संधी आणि प्रत्यक्ष कामकाजाचे स्वरूप याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांकडे व्यावहारिक ज्ञान आणि उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली कौशल्ये असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन CPBFI प्रशिक्षण अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वित्तीय क्षेत्रातील कामकाजाची ओळख होण्याबरोबरच भविष्यातील रोजगारासाठी स्वतःला सक्षम करण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. आरती गुहागरकर यांनी केले. यावेळी प्रा. किशोर मंडले, प्रा. अश्विनी टाकळे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रोजगाराभिमुख उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा तसेच संस्थेच्या सर्व सभासदांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे, या दृष्टीने महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.