रामेश्वर संस्थानच्या कार्तिकोत्सवाची सांगता

आचरा–अर्जुन बापर्डेकर,

 

संस्थान आचरे गावच्या गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवातील पालखी सोहळ्याची सांगता मंगळवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमे ला दिपोत्सवाच्या संगतीने झाली तर पहाटे सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता बुधवारी पहाटे दहिहंडी फोडून करण्यात आली.

संस्थान आचरेगावचा सर्वात मोठा उत्सव म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो.कोजागिरी पौर्णिमा, ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर हा उत्सव सुरू असतो.यात रात्रौ पालखी सोहळा असतो तर पहाटे विठ्ठल मंदिरात काकड आरती रंगते.पहाटे साडेचार पासूनच विठ्ठल नामाचा जयघोष सुरु होतो.अभंग,गजर,भक्तीगीते गाईली जातात.विठ्ठल रखुमाई, शिवराम महाराज पादुकांचे ब्राह्मण सचिन केळकर यांच्या हस्ते विधिवत स्नान पुजन ,नैवेद्य आदी विधी होतात.काकडा ओवाळला जातो.रामेश्वर आरतीसह विठ्ठलाच्या आरती घेऊन भक्तजन रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा घालतात.असा काकड आरतीचा महिनाभर थाट होता. कोजागिरी पौर्णिमेपासून रोज रात्री रामेश्वर मंदिराला सोमसुत्री प्रदक्षिणा घातली जाते.

कार्तिक दशमीला आचरा वरचीवाडी येथील नारायण मंदिराला तर कार्तिक एकादशीला देवूळवाडी येथील विठ्ठल मंदिराला श्री विष्णू विराजीत पालखी भेट देते.हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी रामेश्वर मंदिर ,दिपमाळा आकर्षक फुलांनी सजविण्यात येवून दिपोत्सव करण्यात आला होता. वर्षातून काही ठराविक वेळीच होणारे पंचमुखी महादेवाचे दर्शन त्रिपुरारी पूर्णिमेदिवशी होत असल्याने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बुधवारी पहाटे विठ्ठल मंदिरातील काकड आरतीला रामेश्वर मंदिर प्रदक्षिणेनंतर पावल्यांचा फेर धरून दहिहंडी फोडून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.