जेसीबीच्या साहाय्याने विहिरीला उतार करून सुरक्षित काढले बाहेर
नैसर्गिक अधिवासात केले मुक्त
बांदा : भालावल परिसरात एका शेतविहिरीत अनावधानाने पडलेल्या गवारेड्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यास वनविभागाला यश आले आहे. ही घटना गुरुवारी घडली असून, जेसीबीच्या साहाय्याने विहिरीला उतार करून बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्या गव्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
भालावल येथील रहिवासी गुरुनाथ गावडे यांच्या शेतविहिरीत एक गवारेडा पडला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संबंधित विहिरीला सुरक्षा कठडा नसल्याने परिसरात चरत असताना अनावधानाने हा गवारेडा विहिरीत कोसळला असल्याचे निदर्शनास आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बांदा राऊंडचे कर्मचारी आणि वनविभागाच्या जलद कृती दलाने (आरआरटी) तातडीने बचावकार्य सुरू केले. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने विहिरीच्या एका बाजूने माती उकरून बाहेर पडण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. या प्रयत्नांनंतर गवारेडा सुखरूपपणे विहिरीतून बाहेर पडला आणि त्याने लगतच्या जंगलातील आपल्या नैसर्गिक अधिवासात धाव घेतली.
या संपूर्ण बचावकार्यात वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्यासह जवान शुभम कळसुलकर, देवेंद्र परब, शुभम फाटक, सिद्धेश राऊळ आणि संदेश हळदणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना वनपाल नागेश खोराटे तसेच वनरक्षक गजानन सकट, वैभव इथापे आणि पवन तरपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या मोहिमेदरम्यान स्थानिक ग्रामस्थ संदीप परब, सतीश गुळेकर, विहिरीचे मालक गुरुनाथ गावडे, विलास देसाई आणि संदीप गुळेकर हे देखील उपस्थित होते. वनविभागाच्या या तत्पर कार्यवाहीबद्दल परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.













