मराठा समाजाच्या वतीने जानेवारीत ३२ वे जिल्हा स्नेहसंमेलन; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव!

५ वी, ८ वी शिष्यवृत्ती, दहावी-बारावी आणि उच्च शिक्षणातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्तिपत्रक

स्वप्निल कदम- कुडाळ :        सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई यांच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये ३२ वे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्नेहसंमेलनात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात येणार आहे.

 

या सोहळ्यात इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह दहावीमध्ये ८५ टक्के व त्यापेक्षा अधिक, तर बारावीमध्ये ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच पदवी परीक्षेत उच्च श्रेणी प्राप्त केलेले आणि Engineering, Pharmacy, IT, Agriculture व अन्य शाखांमध्ये उच्च श्रेणी मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात येणार आहे.

 

या गुणगौरव सोहळ्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मराठा समाज हॉल, कुडाळ येथे जमा करावी. तसेच सावंतवाडी येथील टी. एच. देसाई विद्यार्थी वसतिगृह, सालईवाडा येथेही गुणपत्रिका जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या सोहळ्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबईच्या कुडाळ स्थानिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.