ओटवणे देऊळवाडीत गाई-म्हशींसोबत घरी आलेल्या सांबराच्या नवजात पिल्लाला वनविभागाकडून जीवदान

 

ओटवणे :

ओटवणे देऊळवाडी येथील जान्हवी गावकर यांच्या गाई-म्हशींसोबत चुकून घरी आलेल्या सांबराच्या एका नवजात पिल्लाला वनविभागाच्या जलद कृती दलाने (आरआरटी) सुखरूप ताब्यात घेऊन पुन्हा त्याच्या आईजवळ नैसर्गिक अधिवासात सोडले. वनविभागाच्या या तत्परतेमुळे अवघ्या पाच ते सहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या या पिल्लाला नवे जीवदान मिळाले आहे.

ओटवणे देऊळवाडीतील रहिवासी जान्हवी गावकर यांच्या गाई-म्हशी नेहमीप्रमाणे रानात चरण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी जनावरे घरी परतत असताना त्यांच्या कळपामागे सांबराचे हे लहान पिल्लूही चुकून गावात आणि थेट गावकर यांच्या घरापर्यंत आले. ते अवघे पाच-सहा दिवसांचेच असल्याचे निदर्शनास येताच जान्हवी गावकर व स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ या घटनेची माहिती वनविभागाला दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या जलद कृती दलाचे (आरआरटी) प्रमुख रामचंद्र ऊर्फ बबन रेडकर हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या पिल्लाची पाहणी करून त्याला सुखरूप ताब्यात घेतले. पिल्लू अवघे काही दिवसांचे असल्याने त्याला आईची नितांत गरज होती. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने कोणताही विलंब न लावता, पिल्लाला पुन्हा जंगलात नेऊन त्याच्या आईच्या दिशेने नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले.

या संपूर्ण बचाव आणि पुनर्वसन मोहिमेत आरआरटी प्रमुख रामचंद्र (बबन) रेडकर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी देवेंद्र परब, शुभम फाटक आदींनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ उमेश हुले, विष्णू गावकर, जयसिंग गावकर, संतोष गावकर, शंकर भालसे आणि जान्हवी गावकर आदी उपस्थित होते. या सर्व ग्रामस्थांच्या समक्षच सांबराच्या पिल्लाला जंगलात सोडण्यात आले. ग्रामस्थांनी दाखवलेली सतर्कता आणि वनविभागाने केलेली तत्पर कार्यवाही यामुळे या मुक्या जीवाला आपली आई आणि घर पुन्हा मिळाले असून परिसरात या कामाचे कौतुक होत आहे.